
मराठी भाषा शिकवणाऱ्या शिक्षिकांचा सन्मान : ‘ऐक, एक गोष्ट सांगतो’ या राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचाही विशेष गौरव
पुणे : मराठी भाषा ही चिरंतन आणि प्रवाही आहे. दर्जेदार साहित्य, काव्य आणि कलांचा संगम मराठीत आपल्याला पहायला मिळतो. ही भाषा टिकवण्याचे आव्हान सध्या उभे ठाकलेले असताना शिक्षक महत्वाची भूमिका बजावत आहेत. भाषेसाठी काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक आणि शिक्षकांचा गौरव करण्याची कल्पनाच उत्तम असल्याचे प्रतिपादन संपादक-ज्येष्ठ पत्रकार तथा विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी केले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘शब्दसारथी’ संस्थेच्या वतीने विशेष गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कुलकर्णी बोलत होते. यावेळी लेखक नितीन थोरात, ज्येष्ठ साहित्यिका डाॅ. मनिषा पोतदार, शब्दसारथीचे संचालक पराग पोतदार आदी उपस्थित होते. यावेळी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला असताना या मराठीचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे काम करणाऱ्या मराठी विषयाच्या शिक्षिकांना ‘मराठीचे खरे शिलेदार’ म्हणून सन्मानित करण्यात आले. अनंत अडचणींतून वाट काढत टिकून राहिलेल्या आणि गुणवत्ता राखलेल्या मराठी शाळांना या वेळी अनोखी मानवंदना देण्यात आली.
ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या मराठी विषयीच्या शिक्षिका अश्विनी जोशी, जयश्री काटीकर, गोळवलकर पूर्वप्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अपर्णा साने, शिक्षिका माधुरी बापट, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षिका कांचन सोलापूरकर, चिंतामणी ज्ञानपीठातील मराठी शाळेच्या शिक्षिका मीनाक्षी ज्योतिक, प्रियदर्शनी शाळेच्या मराठी भाषेच्या शिक्षिका नीता बाबर यांना सन्मानपत्र, शाल देऊन गौरवण्यात आले. शब्दसारथीच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘ऐक, एक गोष्ट सांगतो’ या राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी थोरात म्हणाले, गोष्ट सांगण्याची ऊर्मी प्रत्येकामध्ये असते. आपण आपल्यातील लहान मूल कायम जिवंत ठेवायला हवे. त्यासाठी सगळ्या मुलांनी आपल्या पालकांसमवेत बसून गोष्ट फुलवण्याचा खेळ एकत्रित बसून खेळायला हवा. प्रास्ताविक पराग पोतदार यांनी केले. सूत्रसंचालन स्वप्नगंधा वस्ते यांनी केले. तर, मनिषा पोतदार यांनी आभार मानले.