
थकबाकीदारांच्या २६०० मिळकती सील, तर बावन्न कोटी रुपयांची कर वसुली
दरम्यान, महापालिकेच्या मिळकतकर विभागाची थकबाकी सुमारे दहा हजार कोटींच्यावर गेली आहे. त्यामुळे, न्यायालयीन वाद नसलेल्या मिळकती महापालिका प्रशासनाकडून सील करण्यात येत आहेत. मागील वर्षभरात महापालिका प्रशासनाने शहरात २६०० मिळकती सील केल्या असून त्यातील दोन हजार मिळकतींचा एकाच वेळी लिलाव केला जाणार आहे. या मिळकतींची थकबाकी २०० कोटी रूपये असून मार्च २०२५ पूर्वी ही लिलाव प्रक्रीया करण्याचे नियोजन असल्याची माहिती महापालिकेच्या कर संकलन विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली. दरम्यान या महिना अखेर पर्यंत मिळकतकराचे उत्पन्न्न १८७० कोटी रूपयांवर गेले आहे. कर संकलन विभागास २०२४-२५ या वर्षासाठी सुमारे २७२७ कोटींचे उदिष्ठ देण्यात आले असून अद्यापही हा ८०० कोटींची वसूली आवश्यक आहे. मात्र, शासनाकडून महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३४ गावांच्या मिळकतकर वसूलीला ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थगिती दिल्याने महापालिकेस या गावांमधून मिळणाऱ्या सुमारे ४०० ते ५०० कोटींच्या महसूलावर पाणी सोडावे लागणार असल्याने महापालिकेकडून उत्पन्नवाढी शहरातील थकबाकीदारांच्या वसूलीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले असून मिळकती सील करण्यावर भर दिला जात आहे.
—
लिलावासाठी नेमली स्वतंत्र पथके
महापालिका प्रशासनाकडून या लिलाव प्रक्रीयेसाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आले असून त्यांच्याकडे केवळ याच कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. मिळकतीची किंमत निश्चित करणे, थकबाकीदारांना लिलावाच्या नोटीसा देणे, लिलावाचे नियोजन ही कामे या पथकाकडे असणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. महापालिकेकडून मागील वर्षांपासून मिळकतींचा लिलाव करण्याची प्रक्रीया हाती घेतलेली असून आता पर्यंत तीन वेळा लिलाव झालेले आहेत मात्र, या लिलावांना फारसा प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे आता महापालिका एकाच वेळी २ हजार मिळकतींचा लिलाव करणार असल्याने याला तरी प्रतिसाद मिळणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.