
मुंबई : हिन्दी सिनेसृष्टीमधील अभिनेता सैफ अली खान याच्या घरात चोरीच्या उद्देशाने घुसून त्याच्यावर हल्ल्या करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मुंबई गुन्हे शाखा आणि ठाणे पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत त्याला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे हा आरोपी बांग्लादेशी नागरिक असल्याचे समोर आले आहे. शनिवारी मध्यरात्री उशिरा ठाण्यातील कासारवडवली भागातून त्याला ताब्यात घेण्यात आले.
मोहम्मद शरीफुल इस्लाम (३०) असे त्याचे नाव आहे. ठाण्यातील उच्चभ्रू हिरानंदानी इस्टेटला लागून असणाऱ्या लेबर कॅम्पमधून मुंबई पोलिसांनी संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या. वांद्रे पोलीस, मुंबई गुन्हे शाखा आणि ठाणे पोलीस यांच्या संयुक्त कारवाईतून ही अटक करण्यात आली आहे. मोहम्मद इस्लामची तात्काळ चौकशी सुरू करण्यात आली. पोलिसांपासून बचाव करण्यासाठी तो झुडपात लपून बसलेला होता. चौकशी दरम्यान त्याने गुन्हा कबूल केल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.
मोहम्मद इस्लामने गुरुवारी पहाटे अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या घरातच चाकू हल्ला केला होता. या घटनेत तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर सुमारे ७० तासांनी आरोपीला अटक करण्यात आली. तीन दिवस त्याचा अहोरात्र शोध सुरू होता. त्यासाठी शंभर पोलीस कार्यरत होते. त्याच्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल असून कारागृहात तो काही काळ राहिलेला आहे. त्याची चौकशी सुरू असून रविवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
दरम्यान, आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्याचे निष्पन्न झाले आहे. बांगला देशातून मुंबईत तो आला होता. मुंबईत त्याच्यासोबत राहणाऱ्या दोघांची शनिवारी गुन्हे शाखेने चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपी मुंबईत हाऊस किंपींग एजन्सीमध्ये कामाला होता. आरोपीकडे कोणतीही भारतीय अधिकृत कागदपत्रे नसल्यामुळे त्याच्याविरोधात पारपत्र कायदा व परकीय नागरिक कायद्याअंतर्गत कलमांची वाढ करण्यात आली आहे. आरोपी पूर्वी ठाण्यातील हॉटेलमध्ये कामाला होता. त्याने विजय दास असे हिंदू नाव धारण केले होते.