
छत्रपती संभाजीनगरातून दोन अभियंता तरुणांना बेड्या
छत्रपती संभाजीनगर : एका बहुचर्चित ‘डिजिटल अटक’ सायबर फसवणूक प्रकरणाचा छडा लावत संभाजीनगर येथून दोन अभियंता तरुणांना अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या असून दोघांनाही तामिळनाडू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
श्रीकांत सुरेशराव गाडेकर (३४, वाडगाव कोल्हाटी, वालूज) आणि नरेश कल्याणराव शिंदे (२६, तिसगाव चौफुली) अशी आरोपींची नावे असून, त्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे लोकांना अटक करण्यात येत असल्याचे भासवत तब्बल ₹२.२७ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
तामिळनाडूतील चेन्नई येथील प्रभाकरण कुंदू चंद्रन रवी या नागरिकाला आरोपींनी एक व्हिडीओ कॉल करून, त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याचा बनावट खटला दाखवला. न्यायालयात सुनावणी सुरु असल्याचे दाखवण्यासाठी बनावट न्यायालय, पोलीस वकिलांचे व्हिज्युअल वापरले गेले आणि त्याला भीती दाखवून बँक खात्यातून २.२७ कोटी रुपये वळवण्यात आले.
थिरुवांचेरी (तांबरम) सायबर पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून तपास करून २९ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथील देओळाई चौकातील एका हॉटेलमध्ये छापा टाकून दोन्ही आरोपींना अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक व्ही. के. सशीकुमार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. स्थानिक पोलीस स्टेशनमध्येही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यांत ‘डिजिटल अटक’ प्रकारात तामिळनाडू राज्यात ३५० हून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. या फसवणूक प्रकारात आरोपी सीबीआय, ईडी, किंवा पोलीस अधिकारी असल्याचे भासवतात आणि नागरिकांना ऑनलाईन गुन्हे दाखवून पैसे उकळतात. Microsoft Digital Crimes Unit, CBI आणि जपानच्या JC3 या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मदतीने नुकतीच मोठी मोहीम राबवली गेली. त्यात ६६,००० बनावट वेबसाईट्स बंद करण्यात आल्या.
सध्या ही प्रकरणं राज्यभर कमी होत असली, तरीही नागरिकांनी कोणत्याही अनोळखी अधिकाऱ्याच्या कॉलवर विश्वास ठेवू नये आणि तत्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार करावी.