
टोळी बनवून करीत होता नाशिक महामार्गावर चोऱ्या
ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत खळबळजनक माहिती समोर
पुणे : भारतात खळबळ उडवून देणाऱ्या गुजरातमधील २००२ मध्ये झालेल्या कारसेवकांच्या गोध्रा रेल्वेहत्याकांडामधील आरोपीने पुण्यात येऊन चोरी करण्याचा नवा धंदा सुरू केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ग्रामीण पोलिसांने त्याला बेड्या ठोकल्या असून तो हत्याकांड प्रकरणार ‘पॅरोल’वर कारागृहाबाहेर आलेला होता. तेव्हापासून तो पुन्हा कारागृहात परतलाच नव्हता. त्यानंतर त्याने, गुन्हेगारी टोळी तयार करून चोऱ्या सुरू केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सलीम उर्फ सलमान युसुफ जर्दा (वय ५५), साहील हनीफ पठाण (वय २१), सुफीयान सिकंदर चॅदकी (वय २३), आयुब इसाग सुनठीया (वय २९), इरफान अब्दुलहामीद दुरवेश (वय ४१, रा. गोध्रा, जि. पंचमहाल, गुजरात) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सोमनाथ नारायण गायकवाड (वय ३०, रा. करकंब, ता. पंढरपुर, सोलापुर) यांनी फिर्याद दिलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड ही ७ जानेवारी रोजी पहाटे आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून मौने आणे या जुन्नर तालुक्यातील गावात असलेल्या इंडीयन ऑईल पेट्रोलपंपाच्या मोकळ्या जागेमध्ये ते टेम्पो घेऊन उभे होते. त्यामध्ये भिवंडीमधील जे. के. टायर्स अॅन्ड इंडस्ट्रील लिमिटेडचे १६५ टायर होते. हे टायर ते सोलापुर येथे घेऊन निघालेले होते. फिर्यादी गाडी रस्त्याच्या कडेला लावून झोपलेले होते. त्यावेळी अज्ञात चोरटयांनी या टेम्पोमधील १८ लहान टायर, मोठे टायर लंगोट व ट्युब असे २२ नग असा एकूण २ लाख ४९ हजार ६२२ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मंचर व सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ढाबे व पेट्रोलपंप भागात थांबणाऱ्या गाड्यांमध्ये अशाच प्रकारे चोऱ्या झाल्याचे गुन्हे दाखल होते. या गुन्ह्यांचा अभ्यास करून अशाप्रकारचे गुन्हे करणारी टोळी ही गुजरात राज्यातील गोध्रा या ठिकाणची असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली. संशयितांच्या मोबाईलचा तांत्रिक तपास करून गुन्ह्यात वापरलेल्या टेम्पोचा शोध घेण्यात आला. हा टेम्पो नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथून आरोपींनी नेल्याचे समोर आले. त्यानुसार सलीम जर्दा, साहील पठाण, सुफीयान चॅदकी, आयुब सुनठीया, इरफान दुरवेश यांना ताब्यात घेण्यात आले. अधिक तपास केला असता आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून एकूण १४ लाख ४० हजार ८७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नरचे उपविभागीय अधिकारी रविंद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, सहायक फौजदार चंद्रा डुंबरे, हवालदार विकास गोसावी, विनोद गायकवाड, पंकज पारखे, आमित पोळ, अमित मालुंजे, नविन अरगडे, सचिन रहाणे, ओंकार खुणे, गणेश जगताप यांनी केली.
मुख्य आरोपी सलीम उर्फ सलमान युसुफ जर्दा हा गोत्रा हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. त्याला गुजरातच्या न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे. या कालावधीमध्ये तो शिक्षा भोगत असताना रजेवर गेला. मात्र, रजा संपल्यावर देखील तो परत कारागृहात हजर झाला नाही. त्याने टोळी बनवून चोरीचे गुन्हे करण्यास सुरुवात केली.