
Avatar: The Way of Fire ची पहिली झलक आली समोर, चाहत्यांमध्ये वाढली उत्सुकता
#पुणे : अवतार फ्रेंचायझीच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. ‘अवतार’च्या पेंडोरा विश्वात प्रेक्षकांना पुन्हा एक नवीन प्रवासावर घेऊन जाण्याची तयारी दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी केली आहे. या चित्रपटाचे पहिले दोन भाग बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले होते. अशा परिस्थितीत, निर्मात्यांनी ‘अवतार ३’शी संबंधित ब्रह्मांडाची काही अद्भुत झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. ती आता व्हायरल होऊ लागली आहे.
पेंडोराच्या नव्या दुनियेची झलक
डिस्नीने नुकतीच सोशल मीडियावर काही इमेजेस शेअर केली आहेत. यामध्ये ‘अवतार’च्या नव्या दुनियेची झलक पहायला मिळते आहे. या इमेजेसमध्ये नावीच्या वेगळ्या जगाचे आणि एलियन्सच्या जगाचे दर्शन घडवले आहे. ‘अवतार’ आणि ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’च्या यशानंतर निर्मात्यांनी ‘अवतार: फायर अँड ऐश’ या तिसऱ्या भागावर काम सुरू केलं आहे. हा चित्रपट जेम्स कॅमेरून आणि जॉन लँडो एकत्र बनवत आहेत.
शेअर केलेल्या इमेजेसमध्ये डायलन कोल यांनी तयार केलेली दृश्ये आहेत. पहिल्या चित्रात नावी एका उडणाऱ्या विशाल पक्षासारख्या प्राण्याच्या पाठीवर स्वार असल्याचे दिसते, ज्यामुळे पहिल्या ‘अवतार’मध्ये दाखवलेल्या ‘बंशी’ची आठवण येऊ शकते. दुसऱ्या चित्रात नावी आणि विशाल व्हेल माशासारखा तुलकुन समुद्रात एका चमकणाऱ्या बायोल्युमिनसेंट स्पॉटजवळ दिसत आहेत. या चित्रांमुळे पेंडोराच्या नव्या रहस्यांविषयी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.