
सायबर पोलिसांची हैदराबादमध्ये कारवाई
पुणे : आयआयटी मुंबई येथील प्रकल्प देण्याच्या बहाण्याने पुण्यातील एका शिक्षण संस्थेची २ कोटी ४६ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्याला पुणे पोलिसांच्या सायबर पथकाने हैद्राबाद येथून जेरबंद केले. त्याच्याकडून १० डेबीटकार्ड, १३ पासबुक, १५ चेकबुक, एक फाईव्हजी सीमकार्ड, सोने खरेदी पावत्या, इतर कागदपत्रे, ७० हजार रुपये किमतीचे ४ मोबाईल, ०१ टॅब, ०१ लॅपटॉप, १ लाख ५ हजारांचे दागिने, तसेच ४० लाख रुपये किमतीची एक टोयोटा इनोव्हा कार व ८ लाख रुपये किमतीची एक किया सोनेट कार असा एकूण ४९ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सितैया किलारु (वय ३४, रा. मेहेर रोड, हैद्राबाद, तेलंगणा) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका शैक्षणिक संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१९(२), ३१८(४), ३१६ (५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (सी), ६६ (डी) अन्वये ६ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. मुंबई आयआयटी येथील प्रतिष्ठीत प्रोफेसरचे नाव वापरुन शासनाचे एआय व ड्रोन प्रकल्प देण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांना वारंवार मेल व व्हॉट्सअॅप कॉलव्दारे त्यांची दिशाभूल करुन फसवणूक करण्यात आलेली होती.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तांत्रिक विश्लेषणद्वारे आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी आरोपी मुंबई आयआयटीचा प्राध्यापक नसून तो सितैया किलारु असल्याचे समोर आले. आरोपीला शोधण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक स्वप्नाली शिंदे व त्यांचे पथक १८ सप्टेंबर रोजी हैद्राबादला रवाना झाले. त्याला २१ सप्टेंबर रोजी त्याचा निजामपेठ भागात साई नगरमध्ये शोध घेऊन सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. तोच या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार आहे. हैद्राबाद न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड घेऊन त्याला पुण्यामध्ये आणण्यात आले. न्यायालयाने त्याला २८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक संगिता देवकाते, पोलीस हवालदार संदिप मुंढे, बाळासाहेब चव्हाण, नवनाथ कोंडे, संदिप कारकूड, टिना कांबळे, अमोल कदम, सचिन शिंदे, सुप्रिया होळकर, गंगाधर काळे, अदनान शेख, सतिश मांढरे, कृष्णा मारकड यांनी केली.
आरोपी मूळचा विजयवाडामधील असून सध्या हैद्राबाद येथे वास्तव्याला आहे. तो उच्च शिक्षित असून २०१० मध्ये ईएनटीसी इंजिनियर आहे. सन २०१० ते सन २०१४ मध्ये स्टॅफोर्डशाईर युनिर्व्हसिटी, लंडन, युके येथे ईएनटीसीमध्ये मास्टर डिग्री तसेच ब्रिमिंगहम युनिर्व्हसिटी, लंडन, युके येथे ईएनटीसीमध्ये पीएचडी केली आहे. २०१५ ते सन २०१६ कोनेरु युनिर्व्हसिटी हैद्राबाद येथे त्याने नोकरी केली. २०१६ ते सन २०१८ बीआरआयटी विद्यापीठ हैद्राबाद येथे नोकरी केली आहे. २०१९ व २०२० मध्ये युपीएससी पूर्व व मुख्य परिक्षा उत्तीर्ण केली आहे. तसेच, २०२१ मध्ये युपीएससी पूर्वतयारीबाबत ऑनलाईन क्लासेस सुरू केले आहेत. २०२२ पासून कौटुंबिक वाद झाल्यावर सध्या कुठेही नोकरी करीत नाही.