
रुग्णालय प्रशासनाविरुद्ध चौकशीची मागणी; ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह
पुणे : पुणे–सोलापूर महामार्गालगत असलेल्या इंदापूर शहरात एका भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला चढवत विद्यार्थ्यांसह वयोवृद्ध आणि रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांचा चावा घेतला. कुत्र्यांच्या हल्ल्यात १३ नागरिक जखमी झाले असून इंदापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. जखमींना तातडीने इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, येथे अँटी रेबीज सिरम लस (ARS) उपलब्ध नसल्याचे समजताच रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये संताप उसळला.
रेबीजच्या संशयित प्रकरणांत हे औषध अत्यावश्यक असते. रुग्णालय प्रशासनाने मान्य केले की, मागील चार महिन्यांपासून सीरमचा साठा संपलेला असून फक्त प्राथमिक लस उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णांना बारामती किंवा खासगी रुग्णालयांचा रस्ता दाखवावा लागत आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी सीरम तुटवड्याची कबुली दिली. त्यांनी सांगितले की, नुकतीच रुग्णकल्याण निधीतून खरेदीची परवानगी मिळाली आहे. मात्र, स्थानिक औषध दुकाने किंवा इतर मार्गाने आपत्कालीन खरेदी करण्याचा प्रयत्न झाला नाही. अधीक्षक डॉ. सिद्धार्थ नामपल्ली यांनी प्रलंबित बिलांमुळे विलंब झाल्याचे सांगितले, ज्यामुळे प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे.
दरम्यान, इंदापूर नगरपरिषदेकडून पिसाळलेल्या कुत्र्याला पकडून त्याचा बंदोबस्त करण्यात आला. मात्र, तो खरोखरच रेबीजग्रस्त होता की नाही, याची अधिकृत पुष्टी अद्याप व्हायची आहे. भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे स्थानिकांमध्ये रोष वाढत आहे. “सरकारी रुग्णालये किती असंवदेनशीलआहेत, याचे हे उदाहरण आहे,” असे पीडित पांडुरंग शिंदे यांनी सांगितले. आणखी एक जखमी नागरिक अक्षय कदम यांनी रुग्णालय प्रशासनाविरुद्ध चौकशीची मागणी केली. तर नागरिकांनी राज्याचे कृषी मंत्री व स्थानिक आमदार दत्तात्रय भरणे यांनी हस्तक्षेप करून परिसरात लसीचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे.
या घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अजूनही आपत्कालीन परिस्थितीत जीवनरक्षक औषधे नागरिकांच्या आवाक्याबाहेर राहतात, हीच सर्वात मोठी शोकांतिका ठरते.