
पुणे : एका खासगी कंपनीकडे काम करीत असलेल्या एका अभियंत्याने अचानक नोकरी सोडून कंपनीचा डाटा, भारतीय सैन्य दल, भारतीय वायुसेना व भारतीय नौसेना यांची महत्वपूर्ण माहिती चोरल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या अभियंत्यावर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात २१ लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार औंध येथील परिहार चौकात असलेल्या आयान ऑटोनॉमस सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये २८ नोव्हेंबर २०२५ रोजी ते बुधवारपर्यंत घडला.
आनंद मट्टा (वय ३५, रा. विमल ट्विन टॉवर, काटेनगर, पिंपळे सौदागर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अतुल नारायण चौधरी (वय ४१, रा. स्वस्ती अपार्टमेंट, प्रभात रोड, एरंडवणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आनंद मट्टा आयान ऑटोनॉमस सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काम करीत होते. ही कंपनी विविध उपकरणे तयार करते. विशेषतः ड्रोन तयार करण्याचे कंपनीकडे आहे. त्यांनी कंपनीमधील नोकरी अचानक सोडली. कंपनीमध्ये काम करत असताना कंपनीची व भारतीय सैन्य दल, भारतीय वायुसेना व भारतीय नौसेना यांची गोपनिय माहिती स्वत:कडे ठेवली. तसेच त्याच्या ताब्यात असलेल्या फाईल्स, कागदपत्रे, चालू प्रोजेक्ट रिपोर्ट, कागदी दस्ताऐवज, मदरबोर्ड, सेन्सरबोर्डस, पावर पीसीबीएस, सेन्सर्स व हार्डवेअर इत्यादी स्वत:कडेच ठेवले. हे सर्व साहित्य कंपनीमध्ये जमा न करता कंपनीचे आर्थिक नुकसान व्हावे, या हेतूने नोकरी सोडली. तसेच, नोकरी सोडल्यानंतर देखील कंपनीचा ईमेल आयडी व पासवर्ड वापरून कंपनीचा डाटा चोरी केल्याचा संशय असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. कंपनीसोबत झालेल्या करारनाम्याप्रमाणे नोकरी सोडल्याने कंपनीला २१ लाख देणे बंधनकारक असताना ते न देता कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.







