
तोतया पोलिसांनी लांबवले २५ लाख
#कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि निवडणूक आयोग सतर्क झालेला आहे. या रणधुमाळीत देखील ठिकठिकाणी वाहनांची तपासणी सुरू आहे. यासोबतच रोकड, मौल्यवान ऐवज जप्त करण्याचे सत्र सुरू आहे. यामध्ये देखील चोरट्यांना संधी दिसू लागली आहे. कोल्हापुरामधील एका व्यावसायिकाला ‘स्पेशल २६’ स्टाईल ठगवले. निवडणूक आयोगाचे भरारी पथक असल्याचे भासवित या व्यावसायिकाची २५ लाख ५० हजारांची रोकड लांबवण्यात आली. ही घटना मंगळवारी पहाटे पुणे-बंगळुरू महामार्गाजवळ असलेल्या तावडे हॉटेल उड्डाणपुलाजवळ घडली.
सुभाष लक्ष्मण हारणे (वय ५०, रा. बागल चौक, शाहूपुरी, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा यात्रेत पाळणे लावण्याचा व्यवसाय आहे. हारणे हे सोमवारी दिवसभरात व्यवसायातून जमा झालेली रक्कम घेऊन मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास गाडीमधून निघालेले होते. ते तावडे हॉटेलच्या दिशेने जात असतानाच २५ ते ३० वयोगटातील पाच जणांच्या टोळीने त्यांना थांबवले. या सर्वांनी सुटबुट घातलेले होते. तसेच शासकीय अधिकारी असल्याची ओळखपत्रे गळ्यात घातलेली होती. सेवा रस्त्यावर हारणे यांची गाडी थांवण्यात आली.
तसेच, तपासणी सुरू असल्याचे सांगत गाडीची तपासणी सुरू केली. गाडीमधील २५ लाख ५० हजार रुपये असलेली बॅग या तोतयांनी ताब्यात घेतली. आचारसंहिता काळात एवढी मोठी रक्कम बाळगू शकत नसल्याचे सांगत कारवाईची भीती दाखवली. आपल्या व्यवसायाचे पैसे असल्याचे स्पष्टीकरण फिर्यादीने दिले. मात्र, टोळक्याने त्यांना आपल्या गाडीत बसवले. सरनोबतवाडीच्या दिशेने काही अंतरावर ही गाडी नेण्यात आली. रोकड आणि मोबाईल काढून घेत सर्वजण पसार झाले. फिर्यादीला आपण लुटले गेलो असल्याची जाणीव झाली. त्यांनी थेट गांधीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. यातील काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींची गाडी टिपली गेली आहे. त्यावरून पोलिसांची ५ पथके संशयितांचा शोध घेत असल्याचे सांगण्यात आले.