
रॅपर डिव्हाईनवरच्या टीकेनंतर सोशल मिडियावर व्यक्त झाला होता रोष
पुणे : ‘एमटीव्ही हसल ४’मध्ये गेस्ट म्हणून सहभागी झालेल्या रॅपर बादशाहला रॅपर डिव्हाईन आणि मुंबई हिप-हॉपवर कमेन्ट करणं चांगलंच महागात पडलं आहे. सोशल मिडियावर नेटकऱ्यांनी रोष व्यक्त करीत निगेटीव्ह कमेन्ट द्यायला सुरुवात केल्यानंतर बादशाहने सोमवारी सोशल मीडियावर पोस्ट करून दिलगिरी व्यक्त केली. यासोबतच बादशाहने ‘एक्स’वर माफी देखील मागितली आहे.
‘एमटीव्ही हसल ४ ’मध्ये गेस्ट म्हणून बादशाहने ’९९ साईड’चे कौतूक केले. त्याची तुलना डिव्हाईनशी केली. यावेळी तो म्हणाला, की ९९ साईडमध्ये मुंबईमधली डिव्हाईनची जागा घेण्याची क्षमता आहे. बादशाहने हेही नमूद केले की डिव्हाईन हा तो व्यक्ती आहे ज्याने मुंबई हिप-हॉपला लोकप्रिय केले. मात्र, सोशल मीडियावरील अनेकांना त्याची ही टिप्पणी पटली नाही.
बादशाहने आपल्या चुकीची जाणीव झाली असून माफी मागत असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, मुंबई हिप-हॉपला लोकप्रिय करण्यासाठी इतर रॅपर्सचाही मोठा वाटा असल्याचे देखील मान्य केले. एका यूजरने एक्सवर लिहिले, “चलो बादशाह भाऊ, एकट्यानेच बॉम्बे हिप-हॉप मोठे केलेले नाही,’ यावर बादशाहने उत्तर दिले, “सॉरी यार, फ्लोमध्ये बोलून गेलो. नक्कीच नाही, एमीवे, कामभारी, डी इव्हिल आणि इतर सर्वांचेच यामध्ये मोलाचे योगदान आहे.”
शोच्या लेटेस्ट एपिसोडमधील एका छोट्याशा व्हिडिओ क्लिपमुळे हा वाद निर्माण झाला. व्हायरल व्हिडिओमध्ये बादशाह “आपण सर्व डिव्हाईनवर प्रेम करतो. त्याने एकट्याने मुंबई हिप-हॉप उंचावर नेले आहे.” असे म्हटले होते. डिव्हाईनच्या चाहत्यांनी बादशाहच्या विधानाचे कौतुक केले, पण काहींनी इतर रॅपर्सच्या योगदानाकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला.
बादशाहच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिले, “९९ साईड हा गालिबपेक्षा तर नक्कीच उत्तम नाही. बादशाह त्याला पुढचा डिव्हाईन म्हणत आहे. आणखी एका यूजरने लिहिले, “हा चांगला विनोद होता. पुढचा विनोद प्लिज!” असे म्हणत त्याच्या व्यक्तव्याची खिल्ली उडवली.