
मुलाने वृद्ध वडिलांवर वार करुन केला खुन
टीव्ही बंद करुन डोळ्यात ड्रॉप टाकायला सांगितल्याने झाला वाद, कोथरुडमधील घटना
पुणे : वडिलांनी टीव्ही बंद कर, डोळ्यात ड्रॉप टाकायचे आहेत, असे सांगितल्याच्या कारणावरुन झालेल्या वादात मुलाने वृद्ध वडिलांच्या तोंडावर, गळ्यावर चाकूने वार करुन त्यांचा खुन केल्याचा प्रकार समोर आला आहे.
तानाजी पायगुडे (वय ७२, रा. जयभवानीनगर, कोथरुड) असे खुन झालेल्यांचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी सुमन तानाजी पायगुडे (वय ६८) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सचिन तानाजी पायगुडे (वय ३३, रा. जयभवानीनगर, कोथरुड) या मुलाला अटक केली आहे. हा प्रकार त्यांच्या राहत्या घरी गुरुवारी ऑक्टोंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजी पायगुडे हे घरी असतात. तर त्यांचा मुलगा सचिन पायगुडे हा मिळेल तेथे मोलमजुरी करतो. दसरा असल्याने पायगुडे कुटुंब घरीच होते़ तानाजी पायगुडे यांचे डोळे दुखत असल्याने ते डॉक्टरांकडे जाऊन आले होते. डॉक्टरांनी त्यांना डोळ्यात टाकण्यासाठी ड्रॉप दिले होते. ते दुपारी घरातील पोटमाळ्यावर असताना तानाजी पायगुडे यांनी मुलगा सचिन याला टिव्ही बंद कर, डोळ्यात ड्रॉप टाकायचा आहे, असे म्हणाले. यावरुन त्याने वडिलांची वाद घातला. त्यात रागाच्या भरात सचिन याने वडिलांच्या तोंडावर व गळ्यावर चाकूने वार करुन त्यांचा खुन केला. पोटमाळ्यावरील आरडाओरडा ऐकून तानाजी यांची पत्नी सुमन या पोटमाळ्यावर गेल्या. तेव्हा तानाजीे हे गंभीर जखमी अवस्थेत पडल्याचे त्यांनी पाहिले. गंभीर जखमी अवस्थेतील तानाजी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पठारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. सचिन याला वडिलांचा खून केल्या प्रकरणी अटक करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पवार तपास करत आहेत.