
वय-प्रमाणन प्रणालीद्वारे १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदीचे सरकारकडून सुरू आहे ‘प्लॅनिंग’
#नवी दिल्ली : आजकाल सर्व वयोगटातील व्यक्ती मोबाईल वापरत आहेत. स्मार्ट फोनवर असलेले सर्व मोबाईल अॅप वापरण्यात अबालवृद्ध माहिर झालेले आहेत. ही जशी चांगली गोष्ट आहे तशीच ती काळजीत पाडणारी देखील आहे. १६ वर्षांखालील मुले देखील सोशल मीडिया आणि गेम्सच्या आहारी गेल्याने त्यांच्या सर्वांगीण व्यक्तीमत्वावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे आता १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी येण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलिया सरकारने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी या निर्णयाला ‘जगातील अशा प्रकारचे टाकलेले प्रथम पाऊल’ म्हणत याची घोषणा केली आहे. हा कायदा पुढील वर्षाच्या अखेरीस लागू होऊ शकतो, अशी शक्यता आहे.
ऑस्ट्रेलिया सध्या एक वय-प्रमाणन प्रणालीची चाचणी घेतली जात आहे. ज्यामुळे मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रवेश रोखता येणार आहे. या प्रणालीखाली बायोमेट्रिक्स किंवा सरकारी ओळखपत्र यांसारख्या ओळख पद्धतींचा वापर केला जात आहे. जर हा निर्णय प्रत्यक्षात कार्यान्वित झाला तर तर ऑस्ट्रेलिया हा अशा प्रकारचा निर्णय घेणारा पहिला देश ठरेल. अशा प्रकारच्या वय-प्रमाणन प्रणालीद्वारे १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी लागू करण्याची योजना आखली आहे.
अल्बनीज यांनी सांगितले की, ‘सोशल मीडिया आपल्या मुलांच्या व्यक्तीमत्व विकासाला हानी पोहोचवत आहे. मी हे थांबवण्याची घोषणा करीत आहे.’ त्यांनी विशेषत: मुलींशी संबंधित हानिकारक कॉन्टेंट आणि मुलांवर टार्गेट केलेल्या महिलाविरोधी कंटेंटच्या नकारात्मक परिणामांचा उल्लेख केला.
हा प्रस्ताव जगातील सर्वात कठोर कायदा ठरू शकतो, ज्यामध्ये पालकांच्या संमतीनेही मुलांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. विद्यमान खात्यांसाठीही कोणतेही विशेषाधिकार राहणार नाहीत. या बंदीच्या अंमलबजावणीसाठी योग्य पावले उचलण्याची जबाबदारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील असणार आहे.