
सातारा पोलिसांसोबत उडाली चकमक : कुख्यात लखन भोसले यमसदनी तर साथीदार झाला पसार
पुणे : जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरात सातारा पोलिसांसोबत उडालेल्या चकमकीत एका कुख्यात घरफोड्या आरोपीला यमसदनी धाडण्यात आले. त्याला पकडायला गेलेल्या पोलिसांवर त्याने चाकूने हल्ला केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात आरोपीचा मृत्यू झाला. तर, त्याचा साथीदार पसार झाला. ही चकमक शनिवारी पहाटे उडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
लखन भोसले (रा. सातारा) असे ठार झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाला. आरोपी लखन भोसलेवर घरफोडी आणि लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचा शोध सातारा पोलिसांकडून घेतला जात होता. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की लखन भोसले आणि त्याचा साथीदार शिक्रापूरजवळील परिसरात लपून बसले आहेत. त्यानुसार पोलिसांचे एक पथक त्याला पकडण्यासाठी रवाना करण्यात आले.
मात्र, पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधला. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने एका पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर, दूसरा पोलीस अधिकारी त्याला पकडण्यासाठी गेला असता त्यांच्यावर देखील शस्त्रासह हल्ला केला. आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. यामध्ये लखन भोसलेच्या पाठीमध्ये गोळी लागली. दरम्यान, दुसरा आरोपी मात्र घटनास्थळावरून पसार झाला. जखमी भोसले याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्याचा रुग्णालयात पोचण्यापूर्वीच मृत्यू झाला.
लखन भोसले याच्यावर सातारा, पुण्यासह इतर जिल्ह्यांत घरफोडी, दरोडे, चोरी आणि मारहाण अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. गुन्हेगारी विश्वात त्याची दहशत होती. या कारवाईनंतर शिक्रापूर व सातारा परिसरात मोठी खळबळ उडाली असून फरार आरोपीला लवकरच पकडले जाईल, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
यासंदर्भात सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या घटनेला दुजोरा दिला. याप्रकरणी तपास सुरू असून लखन भोसले सराईत गुन्हेगार होता. त्याला पकडायला गेलेल्या पोलिसांवर त्याने चाकूने हल्ला केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला होता. रुग्णालयात नेताना त्याचा मृत्यू झाल्याचे अधीक्षक दोषी म्हणाले.
पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी देखील चकमक घडल्याचे सांगितले. यासंदर्भात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरु असल्याचे ते म्हणाले.