
पुण्यात उडाली खळबळ : शाळेमधील खोलीत विवस्त्रावस्थेत आढळले दोघे
पुणे : शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते पवित्र… त्यातही शिक्षिका ही तर विद्यार्थ्यांना आईसमान असते… मात्र, याच पवित्र नात्याला बट्टा लावणारी एक घटना समोर आली आहे. एका शिक्षिकेने १७ वर्षीय विद्यार्थ्याला लैंगिक भुरळ घालून त्याला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रोत्साहित केले. विशेष म्हणजे शुक्रवार, दि. २७ डिसेंबर रोजी ही शिक्षिका आणि संबंधित विद्यार्थी शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या खोलीत विवस्त्रावस्थेत शारीरिक संबंध करीत असताना आढळून आले. त्यानंतर, या प्रकाराचा भांडाफोड झाला. हा प्रकार खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडला.
याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार,२७ वर्षीय शिक्षिकेविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियम ७, ९ (फ), ११ (६), १२, १४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी या शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून काम करीत आहेत. या शाळेत इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंतची मुले व मुली शिक्षण घेत आहेत. शिक्षक, इतर कामगार वर्ग, विद्यार्थी यांच्या सुरक्षेसाठी शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. शाळेमध्ये ‘गुड टच बॅड टच’ या विषयासंबंधी समुपदेशन केले जाते.
सध्या या शाळेमध्ये परिक्षा सुरू आहेत. शुक्रवारी (२७ डिसेंबर) रोजी साधारण पावणेअकराच्या सुमारास एक शिक्षक शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर गेले होते. त्यांनी एक खोली बंद असल्याचे पाहिले. त्यांनी या खोलीचा दरवाजा उघडला असता १० वी मध्ये शिकणारा १७ वर्षांचा एक विद्यार्थी आणि शाळेतील एक महिला शिक्षिका हे दोघेही विवस्त्र अवस्थेत असल्याचे दिसले. त्यांच्यामध्ये शरीर संबंध सुरू होते.
हे दृश्य पाहताच त्यांनी तात्काळ मुख्याध्यपिकेला हा प्रकार सांगितला. मुख्याध्यापिकेने खात्री करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा, हे दोघेही खोलीमध्ये जात असल्याचे दिसले. मुख्याध्यापिकेने याविषयी संबंधित शिक्षिकेकडे आणि विदार्थ्याकडे स्वतंत्र खोल्यांमध्ये चौकशी केली. त्यावेळी महिला उपप्राचार्या देखील उपस्थित होत्या. त्यावेळी संबंधित महिला शिक्षिका आणि विद्यार्थ्याने घडलेला सत्य असल्याची कबुली दिली. या दोघांनी एकमेकांबाबत आकर्षण असल्याचे सांगितले. तसेच, या मुलाच्या घरी एकदा ही शिक्षिका गेलेली होती. त्यावेळी त्यांच्यामध्ये शारीरिक जवळीक निर्माण झाल्याचे सांगितले. घडलेला प्रकार सत्य असल्याची खात्री होताच या मुख्याध्यापिकेने संस्था संचालकांच्या परवानगी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.