
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे निधन
पुणे : कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर झगडणारा, श्रमिकांच्या वेदना स्वतःच्या हृदयात जपणारा आणि अन्यायाविरोधात अखेरच्या श्वासापर्यंत उभा राहिलेला संघर्षशील आवाज सोमवारी रात्री शांत झाला. महाराष्ट्राच्या कामगार चळवळीला दिशा देणारे, असंघटित मजुरांचे बळ ठरलेले ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबासाहेब पांडुरंग आढाव ऊर्फ बाबा आढाव (वय ९६) यांचे सोमवारी रात्री आठ वाजून २५ मिनिटांनी उपचारादरम्यान हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ एक व्यक्ती नाही, तर कष्टकऱ्यांचा आधारवडच हरपला आहे.
पत्नी शीला, मुले असीम आणि अंबर असा त्यांचा परिवार आहे. फुप्फुसाच्या संसर्गामुळे २४ नोव्हेंबर रोजी त्यांना नवी पेठेतील рूना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेली पंधरा दिवस ते अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. प्रकृतीत चढ-उतार सुरू असतानाच सोमवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला. हे वृत्त समजताच कुटुंबीय आणि निकटवर्तीय रुग्णालयात दाखल झाले.
सहा वर्षांपूर्वी बाबांना अस्थिमज्जेतील सौम्य कर्करोगाचे निदान झाले होते. औषधोपचारांनी तो नियंत्रणात आला होता; मात्र वय झाले तरी बाबा थांबले नाहीत. कार्यक्रमांना हजेरी, कष्टकऱ्यांशी संवाद, आंदोलनांत सहभाग – ही त्यांची दिनचर्या कायम होती. वाढते वय आणि संसर्गाचा धोका लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य यांच्या नेतृत्वाखाली अखेरपर्यंत उपचार सुरू होते.
मेडिकल व्यवसायातून सामाजिक संघर्षाकडे वळलेला हा प्रवास विलक्षण आहे. नाना पेठेत डॉक्टर म्हणून काम करताना हमालांची अवस्था जवळून पाहिली आणि १९६६ मध्ये त्यांनी डॉक्टरकी सोडून कष्टकऱ्यांसाठी आयुष्य वाहण्याचा निर्णय घेतला. समाजवादी चळवळीतून आलेले बाबा नगरसेवकही झाले; लोकसभा निवडणूक लढवली, पण अखेर राजकारणापेक्षा कार्यकर्तेपणाला त्यांनी पसंती दिली. १९५५मध्ये हमाल पंचायत आणि १९७२मध्ये तिचे कामगार संघटनेत रूपांतर झाले.
त्यांच्या अखंड लढ्यामुळे १९६९मध्ये ‘महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम’ अस्तित्वात आला असंघटित कामगारांसाठी देशातील पहिला संरक्षणात्मक कायदा. दुष्काळ, महागाई, पुनर्वसन, पाणीहक्क, स्वस्त अन्नधान्य – प्रत्येक प्रश्नात बाबा मैदानात उतरले. ‘एक गाव, एक पाणवठा’ आंदोलन असो वा ‘कष्टाची भाकरी’ योजना, त्यांनी कष्टकऱ्यांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश पेरला.
शोषित, वंचित आणि दुर्लक्षित घटकांचा आवाज बनलेले बाबा आढाव आता आपल्यात नाहीत. पण त्यांनी उभा केलेला संघर्ष, घडवलेली कायदेविषयक क्रांती आणि हजारो कष्टकऱ्यांच्या मनात रोवलेली आत्मसन्मानाची बीजे इतिहासात सदैव जिवंत राहतील.
अंत्यदर्शन हमाल भवनमध्ये
बाबांचे पार्थिव मंगळवारी सकाळी दहा वाजता पुण्यातील मार्केट यार्ड येथील हमाल भवनात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, सायंकाळी साडेपाच वाजता नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत कोणताही धार्मिक विधी न करता विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कष्टकऱ्यांना अश्रू अनावर
“बाबा म्हणजे आमच्यातलाच माणूस होता,” असे डोळे पुसत अनेक कष्टकरी सांगत होते. मजुर, पाठीवर ओझी वाहणारे हमाल, रस्त्यावर रिक्षा चालवणारे चालक – सगळ्यांसाठी बाबा केवळ नेता नव्हते, तर जीवनाची आणि सन्मानाची आशा होते. भाषणांच्या व्यासपीठावर अन्यायाविरोधात ते जितके ठाम असत, तितकेच एखाद्या अपघातग्रस्त मजुराच्या खांद्यावर हात ठेवताना हळवे होत. “देवासारखा माणूस नव्हे, तर आमचा घरातला माणूस गेला,” अशी भावना अनेकांच्या डोळ्यांतून ओघळत होती.






