
सिंहगड रस्ता पोलिसांची कारवाई
पुणे : शहरात चंदनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पोलिसांनी चंदनचोरांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सिंहगड रस्ता पोलिसांनी एका सराईत चंदन चोराला गजाआड केले असून त्याच्याकडून कापलेले चंदनाचे खोड जप्त करण्यात आले आहे. या चंदन खोडाची किंमत एक लाख असल्याचे पोलिसांनी सांगितले.
भरत शिवाजी जाधव (वय ३४, रा. केडगाव-चौफुला, गडदेवस्ती ता. दौंड) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द यवत व हवेली पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी चंदनचोरी झालेली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी हद्दीत गस्त घालीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार शिवाजी क्षिरसागर यांना खबऱ्याने आरोपीबाबत माहिती दिली. आरोपी प्रयेजा सिटी समोरील कॅनोललगत थांबलेला असून त्याच्या जवळ असलेल्या पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये चंदनाचे झाडे कापण्याची हत्यारे असल्याची माहिती या खबऱ्याने दिली होती.
त्यानुसार, तात्काळ सूत्र हलवीत आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये अर्धवट तोडलेले चंदनाच्या झाडाचे तुकडे आढळून आले. त्याने ही चंदनाचे झाड १६ जानेवारी २०२५ रोजी मानस, धायरी परिसर येथून कापून चोरी केल्याचे समोर आले. त्याला अटक करण्यात आली पुढील तपास पोलीस उप निरीक्षक संतोष भांडवलकर करीत आहेत.
ही कारवाई वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक संतोष भांडवलकर, आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, उत्तम तारु, आण्णा केकाण, अमोल पाटील, विनायक मोहीते, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, देवा चव्हाण, सागर शेडगे, विकास पांडुळे, विकास बांदल, स्वप्निल मगर यांनी केली.
सराईत तडीपार गुन्हेगार बाळु धोंडीबा ढेबे (वय २७, रा. राम मंदिराजवळ, जनता वसाहत) याला पोलिसांनी जेरबंद केले असून त्याच्याकडून देशी बनावटीची दोन पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. ढेबे हा नऱ्हे येथील स्वामीनारायण मंदीर ते तक्षशिला सोसायटीकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर थांबलेला होता. त्याच्याबाबत खबऱ्याने माहिती कळवली होती. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अंतरावर त्याला पकडण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ ८० हजार रुपयांचे देशी बनावटीची दोन पिस्तुले व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक संतोष भांडवलकर हे करीत आहेत.