
नशेसाठी गुंगीकारक गोळ्यांचा वापर होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर
६९०० गुंगीकारक गोळया जप्त : दोन तस्करांना खडक पोलिसांकडून बेड्या
पुणे : नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गुंगीच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्या दोघाजणांना खडक पोलिसांच्या पथकाने गजाआड केले असून त्यांच्याकडून तब्बल ६ हजार ९०० गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये निट्राझेपम टॅब्लेट आयपी, निट्झास्केन-१०, अल्प्राझोलमी टॅब्लेट आयपी, अल्प्रास्केन, निट्राफास्ट-१० या अंमली पदार्थाच्या गोळ्यांचा समावेश आहे.
समीर हमीद शेख (वय ४०, बुर्ज अल मर्जान, साईबाबा नगर, कोंढवा), सुनिल गजानन शर्मा (वय ३४, सुखसागर नगर, साईनगर, कोंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ चे कलम ८ (सी), २२ (सी), २९ अन्वये गुन्हा नोंदवन्यात आला आहे. पोलीस शिपाई आशिष चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष चव्हाण यांना खबऱ्यामार्फत आरोपींबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार स्वारगेटच्या जेधे चौकात सापळा लावण्यात आला. दुचाकीवरून आलेल्या आरोपींना थांबवून त्यांची झडती घेण्यात आली. त्यांच्या दुचाकीच्या डिकीत काही गोळ्या आढळून आल्या. त्यानंतर, कोंढवा येथील दोघांच्याही घरी झडती घेण्यात आली. त्याठिकाणी देखील गोळ्यांचा साठा आढळून आला. पोलिसांनी एकूण या अंमली पदार्थाच्या गोळ्या, दुचाकी असा एकूण १ लाख ४७ हजारांचा किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी या औषधी गोळ्या विनापरवाना व डॉक्टरांच्या प्रिस्क्रीपशनशिवाय नशेसाठी खरेदी-विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगलेल्या होत्या.
आरोपी वेगवेगळ्या ठिकाणांवरून हा औषध साठा मागवत होते. तसेच, कोंढवा, कासेवाडी, हडपसर, कॅम्प, येरवडा परिसरात नशेसाठी विकत होते. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शर्मिला सुतार, मनोजकुमार लोंढे, सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे, कुलदीप व्हटकर, उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, अजित फरांदे, कृष्णा गायकवाड, अक्षयकुमार वाबळे, आशिष चव्हाण, इरफान नदाफ, विकास पांडोळे, विधिनाथ गोरे, शुभम केदारी, शोएब शेख, निलेश दिवटे, मयुर काळे, युवराज नाइकरे यांच्या पथकाने केली आहे.







