
पुण्यात आढळले दोन रुग्ण : काळजी घेण्याचे आरोग्यतज्द्न्याचे आवाहन
पुणे : शहरात पावसाळ्याच्या हंगामात हवेत वाढलेले प्रदूषण आणि दमट वातावरण यामुळे फुफ्फुसांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. शहरात बुरशीजन्य फुफ्फुस संक्रमणाचे दोन रुग्ण आढळले आहेत. तज्ज्ञांच्या मते, हे संक्रमण वेळेवर ओळखले नाही तर ते जीवघेणे ठरू शकते.
फुफ्फुसातील बुरशीजुन्य संक्रमण (Fungal Lung Infection) प्रामुख्याने अशा व्यक्तींमध्ये आढळते ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. दमट हवामान, हवेत वाढलेले धूळकण, औद्योगिक व वाहतुकीतील धूर, तसेच बांधकाम साईटवरील धुळीमुळे अशा संक्रमणाचा धोका अधिक वाढतो. पावसाळ्यात हे घटक अधिक सक्रिय होतात, ज्यामुळे नागरिकांच्या श्वसनविकारांचा धोका वाढतो.
तज्ज्ञ डॉक्टरांनी इशारा दिला आहे की, सतत खोकला, श्वास घेण्यास त्रास, ताप, छातीत वेदना अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. वेळेत तपासणी करून उपचार सुरू केल्यास संक्रमणावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. रुग्णालयात आलेल्या प्रकरणांमध्ये रुग्णांना गंभीर श्वसन समस्या होत होत्या आणि त्यांना त्वरित वैद्यकीय उपचारांची गरज भासली. पुणेकरांनी पावसाळ्यात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. प्रदूषण आणि दमट हवामानामुळे फुफ्फुसांच्या आजारांचा धोका वाढलेला असून, नागरिकांनी आरोग्याविषयी जागरूक राहणे हीच सध्या सर्वात मोठी गरज आहे.
कशी घ्याल काळजी?
घरात आणि बाहेर मास्कचा वापर करा.
बांधकाम क्षेत्रात जाणे टाळा.
स्वच्छ पाणी प्या व पोषक आहार घ्या.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पुरेशी झोप आणि व्यायाम करा.
लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.