
अमेरिकेच्या मिडटाउन मॅनहॅटनमध्ये गोळीबाराची घटना; हल्लेखोराची आत्महत्या
न्यूयॉर्क | प्रतिनिधी : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील मिडटाउन मॅनहॅटन परिसरात सोमवारी संध्याकाळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये एक पोलीस अधिकारी आणि स्वतः हल्लेखोराचाही समावेश आहे. ही घटना पार्क अॅव्हेन्यूवरील एका कॉर्पोरेट इमारतीजवळ घडली.
न्यूयॉर्क पोलीस (NYPD) आणि अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेत चार नागरिक आणि एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. संशयित हल्लेखोराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे देखील पोलिसांनी नमूद केले आहे.
एकाच हल्लेखोराची ओळख पटली
NYPD कमिशनर जेसिका टिश यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर एकटाच होता व त्याच्याकडे लॉन्ग-रेंज रायफल होती. प्राथमिक माहितीनुसार, तो आम्हाला मृतावस्थेत आढळून आला आहे. गोळीबाराची ही घटना ३४५ पार्क अॅव्हेन्यू येथे घडली असून ही एक ६३४ फूट उंच इमारत आहे. येथे NFL आणि Blackstone यासारख्या मोठ्या कंपन्यांची कार्यालये असल्याचे टिश यांनी सांगितले.
जखमींची स्थिती आणि परिसरातील परिस्थिती
या हल्ल्यात एक नागरिक गंभीर जखमी झाला आहे, तर पाठीवर गोळी लागलेला पोलीस अधिकारी व दुसरा नागरीक सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
न्यूयॉर्कचे महापौर एरिक अॅडम्स यांनी नागरिकांना पार्क अॅव्हेन्यू आणि ईस्ट ५१ स्ट्रीटजवळील परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी X (माजी ट्विटर) वर पोस्ट करत लिहिले, ‘सध्या मिडटाउन परिसरात झालेल्या गोळीबाराची चौकशी सुरू आहे. नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये.’
पोलीस बंदोबस्त आणि तपास
घटनेनंतर NYPD चे बॉम्ब पथक, ड्रोन युनिट्स, आणि विशेष हत्यारधारी पथक घटनास्थळी दाखल झाले. संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. ऑनलाइन व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना बॅलिस्टिक जॅकेटमध्ये दाखल होताना, तसेच अॅम्ब्युलन्सचे रस्त्यांवर गर्दी करतानाचे दृश्य दिसत होते.
हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही
पोलिसांनी सांगितले की, तात्काळ धोका दूर करण्यात आला आहे. मात्र तपास अजूनही सुरू आहे. हल्लेखोराने नेमके का गोळीबार केला याचा तपास सुरू असून, हल्ल्याचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.