
घटस्फोट घेण्यास लावून नंतर महिलेला दिला लग्नास नकार, पोलीस दलात एकच खळबळ
पुणे : इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेला घटस्फोट घेण्यास भाग पाडले. तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले. त्यानंतर आता लग्नास नकार देऊन विवाहितेचा संसार उद्धवस्त केल्याचा आरोप असलेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षकावर फुरसुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पुणे व पिंपरी चिंचवड पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
अजिक्य रायसिंग जाधव (वय ३२, रा. पाटीलनगर, चिखली, पिंपरी चिंचवड) असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याबाबत एका ३४ वर्षाच्या महिलेने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सप्टेंबर २०२३ ते ३० जुलै २०२५ दरम्यान उरळी देवाची, सदाशिव पेठ येथे घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या फुरसुंगी परिसरात रहायला असून त्या विवाहित होत्या. अजिंक्य रायसिंग जाधव हा गडचिरोली येथे पोलीस दलात नेमणूकीला असताना इन्स्टाग्रामवर दोघांची ओळख झाली. त्यातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. अजिंक्य जाधव याने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोट घेण्यास भाग पाडले.
उरूळी देवाची, सदाशिव पेठ येथे तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले. अजिंक्य जाधव याच्याशी विवाह करण्यासाठी फिर्यादी हिने घटस्फोट घेतला. त्याच्या नावाचे टॅटु काढले. त्यानंतर आता अजिंक्य जाधव याने तिच्याबरोबर विवाह करण्यास नकार दिला. फिर्यादी यांना दिलेले वचन पाळण्याचा हट्ट धरु नये, म्हणून तिला अजिंक्य जाधव याने शिवीगाळ करुन मारहाण केली. तुला काय करायचे ते कर मला कोणी काही करु शकत नाही, अशी धमकी दिली. जाधव याच्याशी विवाह करण्यासाठी तिने पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला. आता हा लग्नाला नकार देतो़. आपला संसार उद्धवस्त झाल्याचे पाहून या महिलेने पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली आहे़ फुरसुंगी पोलिसांनी अजिंक्य जाधव याच्यावर गुन्हा दाखल केला आहे़ पोलीस निरीक्षक राजेश खांडे तपास करीत आहेत.




