
रागेश्री संगीत विद्यालयाच्या भजनी वर्गाचे स्नेह संमेलन उत्साहात
पहाटेचे गार वारे… तालासुरांच्या सोबतीने आळवले जाणारी भजने… भजनाच्या ठेक्यावर डोलणाऱ्या उपस्थित प्रेक्षकांच्या माना… अशी भक्तिरसात न्हायलेली सकाळ उपस्थित प्रेक्षकांनी अनुभवली. निमित्त होते रागेश्री संगीत विद्यालयाच्या भजन स्नेह मेळाव्याचे. ‘रंगू भजनी गायनी, चित्त लागो इशचरणी, मन होईल आनंदी, रमता भक्तीरंग भजनी’ या उक्तीची अनुभूती या कार्यक्रमात आली.

रागेश्री संगीत विद्यालयाच्यावतीने भजन वर्ग चालवले जातात. या भजनी वर्गाचे ११ वे वार्षिक स्नेह संमेलन नुकतेच पार पडले. अरण्येश्वर येथील कै. दादासाहेब केतकर सभागृहात पार पडलेल्या या संमेलनात वातावरण भक्तीने भारून गेलेले होते. या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कलाकार आनंद गोडसे उपस्थित होते. यावेळी गोडसे यांच्या हस्ते कलाकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भाग्यदा गोखले हिने भारतनाट्यम नृत्याद्वारे उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी गोडसे म्हणाले, की रागेश्री संगीत विद्यालयाच्या संचालिका गायत्री गोखले, संचालक सचिन गोखले हे कलेचे खरे उपासक आहेत. त्यांनी अनेक वर्षांपासून संगीतसेवा करताना उत्तम कलाकार घडविण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. त्यांची संगीताप्रती असलेली निष्ठा वाखाणण्याजोगी आहे.

यावेळी भजनी वर्गाच्या कलाकारांनी विविध भजने सादर केली. यामध्ये भजन, कीर्तन, भारूड, गोंधळ आदी शास्त्रीय आणि लोकसंगीताच्या प्रकारांचा समावेश होता. तबल्यावर सचिन गोखले आणि अभिजीत पानवलकर होते. तर, संवादिनीवर गायत्री गोखले होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका मंजुषा खेडकर यांनी केले. तर, आभार प्रदर्शन भाग्यदा गोखले यांनी केले.








