
एकूण मतदान संख्या पोचली ८८ लाखांवर
पुणे : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत ११ लाख नोंदणीकृत मतदार वाढले आहेत. मतदारांची संख्या ८८ लाखांवर पोहोचली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ७७ लाख मतदार होते. या मोठ्या वाढीचे मुख्य कारण म्हणजे शिक्षण, रोजगार आणि व्यवसायाच्या संधींसाठी पुण्यात होणारे स्थलांतर असल्याचे सांगितले जात आहे.
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागातही मतदारसंख्येत वाढ झाली आहे. पुणे जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या माहितीनुसार, जिल्ह्यामधील विविध भागात झपाट्याने होत असलेल्या शहरीकरणामुळे ही वाढ झाली आहे. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. यासोबतच ते आयटी हब म्हणूनही ओळखले जाते. उद्योग, आणि व्यावसायिक केंद्र म्हणून हे शहर विकसित होत असल्याने महाराष्ट्रासह इतर भागांतूनही येथे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे.
“पुण्यातील मतदारसंख्येतील सातत्यपूर्ण वाढ ही जिल्ह्यातील गतिशील विकासाचे द्योतक आहे. अनेक तरुण विद्यार्थी, व्यावसायिक आणि उद्योजक पुण्यात स्थलांतरित झाले आहेत, ज्यामुळे मतदारसंख्येत वाढ झाली आहे.” असे जिल्हा निवडणूक शाखेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. महाराष्ट्रातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या भागांपैकी पुणे हे एक आहे. जिल्ह्यातील शहरीकरण हे ग्रामीण-ते-शहरी स्थलांतराच्या व्यापक बदलाचा भाग आहे. या वाढत्या स्थलांतरामुळे आर्थिक विविधता वाढली असून सामाजिक क्षेत्रात देखील मोठा बदल झालेला दिसून येतो. त्यामुळे वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील नागरिक निवडणूक प्रक्रियेत सक्रीय सहभाग घेत असल्याचे पाहायला मिळते आहे.
२०२४ राज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीतील ही वाढ पुण्यातील वाढत्या लोकसंख्येच्या राजकीय सहभागाचे निदर्शक आहे, ज्यामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक सर्वसमावेशक आणि प्रतिनिधित्वक्षम होणार असल्याचे अधिकारी म्हणाले.