
पुणे : पुण्यात घरफोड्या करणारे चोर पोलिसांनी पकडले आणि उघड झाली यातील एका आरोपीची मूळ ओळख. हा चोर उत्तरप्रदेशचा कुख्यात गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत उत्तर प्रदेशातील या कुख्यात गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे ६२ लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे पुण्यातील घरफोडीच्या मालिकेचा उलगडा झाला आहे.
आकाश सुभाष (वय २३, सध्या सुंदरनगरी, दिल्ली, मूळ मेरठ, उत्तर प्रदेश) आणि जितेंद्र चतुर्वेदी (वय ३२, रा. सुंदरनगरी, दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. विश्रामबाग पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादी घरात नसताना अज्ञात चोरट्यांनी दरवाजा तोडून घरातील दागिने चोरी केले होते.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी तपास पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर यांना आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांचा माग काढला. तपासात आरोपी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात आल्याचे आणि तेथील एका लॉजमध्ये थांबल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ते परराज्यात निघून गेल्याचे समोर आले.
दरम्यान, तपास पथकातील पोलिसांनी वेशांतर करून संशयितांवर पाळत ठेवली. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी पुन्हा घरफोडीच्या उद्देशाने पुण्यात आल्याचे समजताच पोलिसांनी ओंकारेश्वर मंदिराजवळ सापळा रचून २३ फेब्रुवारी २०२६ रोजी दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी चोरीची कबुली दिली. त्यांनी चोरी केलेले दागिने पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील एका लॉजमध्ये लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी तेथून ३२ तोळे सोने आणि १२५ ग्रॅम चांदी जप्त केली.
पुढील तपासात आरोपी आकाश सुभाष हा उत्तर प्रदेशातील ‘सनी गँग’शी संबंधित असून त्याच्यावर गाझियाबाद परिसरात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा आणि गँगस्टर अॅक्टसह अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिस पथक दिल्ली व उत्तर प्रदेश येथे जाऊन इतर चोरीतील दागिनेही जप्त करण्यात यशस्वी झाले. तपासात आरोपींनी पुणे शहरात दिवस-रात्र मिळून किमान पाच घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी तब्बल ४०६.३१ ग्रॅम सोने, १९१.९ ग्रॅम चांदी, लॅपटॉप व दोन मोबाईल असा एकूण ६२ लाख ८१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ०१) कृषीकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले, वरिष्ठ निरीक्षक प्रदिप कसबे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरुण घोडके यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी राजेश उसगावकर, पोलीस अंमलदार सचिन कदम, गणेश काठे, अमोल भोसले, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, कैलास डुकरे, जाकीर मणियार, आशिष खरात, राहुल मोरे, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, सागर मोरे, अर्जन थोरात, नितीन बाबर, अर्जुन कुडाळकर यांनी केली.






