
208 वाहनचालकांवर थेट कारवाई; 40 ठिकाणी नाकाबंदी
पुणे : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक विभागाने मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम राबवून कडक कारवाई केली आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11 वाजल्यापासून ते 1 जानेवारी 2026 रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली.
या कालावधीत पुणे शहरातील विविध भागांमध्ये 40 ठिकाणी नाकाबंदी पॉईंट उभारण्यात आले होते. या विशेष तपासणीदरम्यान एकूण 2,128 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या 208 वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 51 वाहने मोटार वाहन कायद्यानुसार जप्त करण्यात आली असून, विविध उल्लंघनांपोटी ₹70,400/- इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
नाताळ व नववर्ष कालावधीत 486 वाहनचालकांवर कारवाई
नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर 24 डिसेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत दररोज रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत, पुणे शहर वाहतूक शाखेअंतर्गत असलेल्या 30 वाहतूक विभागांमार्फत मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम 185 अन्वये कारवाई करण्यात आली. या कालावधीत एकूण 486 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
सन 2025 मध्ये 6,765 ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणे
सन 2025 (1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025) या कालावधीत पुणे शहर वाहतूक शाखेच्या अखत्यारितील 30 वाहतूक विभागांमार्फत मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या 6,765 वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम 185 अंतर्गत कारवाई करून खटले दाखल करण्यात आले आहेत. हे सर्व खटले मा. न्यायालयात सादर करण्यात आले असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली.
नागरिकांना वाहतूक विभागाचे आवाहन
मद्यप्राशन करून वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा असून, त्यामुळे अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून स्वतःचा तसेच इतरांचा जीव सुरक्षित ठेवावा, असे आवाहन पुणे शहर वाहतूक विभागातर्फे करण्यात आले आहे.
– मा. श्री. हिंमत जाधव
पोलीस उप आयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर







