
एकाच दिवशी ३० हून अधिक बेदरकार चालकांवर गुन्हे; नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांचा बडगा
पुणे : शहर वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवत १,४५४ दुचाकींवर थेट कारवाई केली आहे. या कारवाईतून तब्बल ₹१६,१८,४०० दंड वसूल करून शासनाकडे जमा करण्यात आले. शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मंगळवारी (१० फेब्रुवारी) वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध व्यापक कारवाई करण्यात आली. काळेपडळ, चंदननगर, वाघोली, विमानतळ, लोणीकंद आणि खराडी परिसरात एकाच दिवशी तब्बल ३० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले. बेदरकार वेगाने वाहन चालविणे, ट्रिपल सीट प्रवास, परवाना नसताना दुचाकी चालविणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, सायलेंसरमधून फटाक्याचा आवाज काढणे तसेच वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार उघडकीस आले.
ही मोहीम पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. शहरातील प्रमुख चौक, गर्दीचे रस्ते आणि वाहतूक कोंडीच्या ठिकाणी एकाच वेळी व्यापक तपासणी करण्यात आली.
काळेपडळ परिसरात सलग कारवाई
काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हांडेवाडी रोड, उंड्री चौक, पिसोळी, रेल्वे फाटक, जेएसपीएम कॉलेज परिसरात सकाळपासून दुपारपर्यंत कारवाईची मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत अनेक तरुण चालक ट्रिपल सीट, भरधाव वेग आणि परवाना नसताना वाहन चालविताना आढळले. भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ तसेच मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास संबंधित पोलीस अधिकारी करीत आहेत.
चंदननगर : परवाना नसताना मोबाईलवर बोलत वाहनचालक जाळ्यात
ब्रम्हा सनसिटी चौक, वडगावशेरी परिसरात कारवाईदरम्यान काही चालक परवाना नसताना मोबाईलवर बोलत बेदरकारपणे वाहन चालविताना मिळून आले. वाहनमालकांनी परवाना नसलेल्या व्यक्तींना वाहन दिल्याचेही उघड झाले. या प्रकरणी भा.न्या.सं. २८१ सह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वाघोलीत कॉलेज परिसरात स्पीडस्टर्सवर धडक
बीजेएस कॉलेज, जेएसपीएम कॉलेज, लाईफलाईन हॉस्पिटल परिसर, अहील्यनगर रोड या भागांत पोलिसांनी विशेष मोहीम राबवली.
अनेक युवक भरधाव वेगाने, काही जण सायलेंसरमधून फटाक्यांचा आवाज करत वाहन चालविताना आढळले. सर्वांवर गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
विमानतळ, लोणीकंद आणि खराडी येथेही कारवाई
विमाननगर चौक, आयटी पार्क रोड, म्हसोबा मंदिराजवळील सार्वजनिक रस्ता तसेच वर्ल्ड ट्रेड सेंटर परिसरात वाहनचालक बेदरकार पद्धतीने वाहन चालविताना आढळले. ट्रिपल सीट, नियमभंग आणि कागदपत्रांचा अभाव या कारणांवरून गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलिसांचा इशारा
“सार्वजनिक रस्त्यावर वेगाचा थरार दाखविणे किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे सहन केले जाणार नाही,” असा इशारा पोलिसांनी दिला असून आगामी काळातही अशी मोहीम सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
कारवाईचा तपशील:
* १,४५४ ट्रिपल सीट वाहनांवर कारवाई
* २,१४४ चलन तत्काळ पेड
* ₹१६.१८ लाख दंड वसूल
* ५,९२१ एकूण चलनांची नोंद
#PuneTraffic #TrafficPolice #RoadSafety #PuneNews #TrafficRules





