
पंतप्रधानांचा पुणे दौरा : सभेनिमित्त मध्यभागात वाहतूक बदल
पुणे : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर येणार आहेत. येत्या मंगळवारी (१२ नोव्हेंबर) रोजी मोदी यांची स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सभा होणार आहे. या दौऱ्यानिमित्त स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत. वाहनचालक व नागरिकांनी याची नोंद घेऊन पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
असा असेल वाहतुकीमधील बदल :
सदाशिव पेठेतील विजयानगर कॉलनी परिसरातील ना. सी. फडके चौक ते नाथ पै चौक दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद राहील. वाहनचालकांनी ना. सी. फडके चौकातून डावीकडे वळून नीलायम चित्रपटगृहमार्गे पर्वती उड्डाणपुलाखालील रस्त्याने सिंहगड रस्त्याकडे जावे. नाथ पै चौकातून वाहनचालकांनी सरळ सिंहगड रस्त्याकडे जावे. बाबुराव घुले पथ, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, आंबील ओढा परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद राहतील. वाहनचालकांनी टिळक आयुर्वेद महाविद्यालय चौकातून डावीकडे वळून जॉगर्स पार्कमार्गे शास्त्री रस्त्याकडे जावे. तेथून इच्छितस्थळी जावे. साने गुरुजी पथ परिसरात (टिळक रस्ता चौक ते नीलायम चित्रपटगृह) सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.
टिळक चौक ते भिडे पूल चौक दरम्यान एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी काकासाहेब गाडगीळ पूल (झेड ब्रीज) डावीकडे वळून भिडे पुल चौकातून उजवीकडे वळून इच्छितस्थळी जावे. गरुड गणपती चैाक ते भिडे पूल चौक दरम्यानची वाहतूक बंद राहणार आहे. वाहनचालकांनी गरुड गणपती चौकातून डावीकडे वळून टिळक चौकातून वळून केळकर रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे. डेक्कन जिमखाना परिसरातून भिडे पूलमार्गे केळकर रस्त्यावर येण्यास वाहनांना मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांनी नदीपात्रातील रस्त्याने इच्छितस्थळी जावे. सोमवारी मध्यरात्री बारानंतर शहरात येणाऱ्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्री बारापर्यंत जड वाहनांनी शहरात येण्यास मनाई करण्यात आली आहे.
मंगळवारी सायंकाळी सहा ते रात्री बारापर्यंत जंगली महाराज रस्ता (संचेती चौक ते खंडोजीबाबा चौक), येरवड्यातील गोल्फ क्लब चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, टिळक चौक ते नाथ पै चौक (शास्त्री रस्ता), खंडोजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक (फर्ग्युसन रस्ता) या रस्त्यांवर दुतर्फा सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले.