
पुणे सायबर पोलिसांकडून (Cyber Police) बांधकाम व्यावसायिक आरोपी गजाआड
पुणे : एका ज्येष्ठ नागरिकाला व्हॉटसअपद्वारे ऑनलाईन संपर्क साधत त्यांच्यावर मनी लॉन्डरिंगचा आरोप असल्याची बतावणी करीत ६ लाख ३१ लाख रुपये उकळणाऱ्या एका तोतया पोलिसाला अटक करण्यात आली आहे. हा तोतया पोलीस एक बांधकाम व्यावसायिक असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने पोलीस असल्याचे भासवित ऑनलाईन फ्रॉडद्वारे या ज्येष्ठाला गंडा घातला होता. मात्र, सायबर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करीत पनवेलमधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याला या गुन्ह्यात साथ देणारा त्याचा वडील मात्र पसार झाला आहे.
तुषार हरिश्चंद्र वाजंत्री (रा. राजगड) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याचा वडील हरिश्चंद्र चांगू वाजंत्री सध्या फरार आहे. तुषारला पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीवर देशभरामधून नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर पाच सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी नोंदवण्यात आलेल्या आहेत. आरोपी देशव्यापी सायबर गुन्हेगारी टोळीचा भाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. फरार असलेल्या आरोपी हरिश्चंद्र वाजंत्रीच्या शोधासाठी पुणे सायबर पोलीस केरळ पोलिसांशी समन्वय साधून तपास करत आहेत. केरळमध्येही या प्रकरणात समांतर तपास सुरू आहे.
याबाबत गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख म्हणाले, की ‘१ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत पुण्यात राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअॅप कॉलवरून काही जणांनी संपर्क साधला. त्यांनी पोलीस अधिकारी असल्याचे भासवत सातत्याने संपर्क केला. त्यांनी या ज्येष्ठाला त्यांच्यावर मनी लॉन्डरिंगचा आरोप असून ते ‘डिजिटली अटक’ आहेत असे सांगितले. कायदेशीर कारवाईचा धाक दाखवून आणि दडपण टाकून त्यांनी ज्येष्ठ नागरिकाकडून विविध खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे ट्रान्सफर करून घेतले.’
आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे उपायुक्त विवेक मसाळ यांनी सांगितले, की ‘११ नोव्हेंबर २०२४ रोजी ज्येष्ठाच्या खात्यातून २० लाख रुपये ‘श्री धावीर कन्स्ट्रक्शन’च्या नावाने असलेल्या एचडीएफसी बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले होते. ही कंन्स्ट्रक्शन फर्म कोकणातील रोहा तालुक्यातील कोकबन गावात नोंदणीकृत असल्याचे तपासात समोर आले. पुढील तपासात हेही समोर आले की, आरोपींनी या फसवणुकीतील पैशांतून १० लाख आणि २० लाख रुपयांचे फिक्स डिपॉझिट तयार केले होते.’
सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी सांगितले, की ‘आम्हाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आमच्या पथकाने कोकणातल्या जोरदार पावसातही पनवेल परिसरात रात्री ‘सर्च ऑपरेशन’ राबवले आणि एका गावाजवळील ऐश्वर्या रिसॉर्टच्या जवळून तुषार वाजंत्रीला अटक करण्यात यश मिळवले.’ ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
आवाहन
पोलिसांनी नागरिकांना अशा अनोळखी आणि संशयास्पद कॉल्सबाबत सावध राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः जे कायदेशीर कारवाईचा धाक दाखवून पैसे मागतात, अशा संशयास्पद प्रकारांबाबत www.cybercrime.gov.in या नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर किंवा हेल्पलाइन क्रमांक १९३० वर तक्रार नोंदवावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.