
गुन्हे शाखेकडून छापा टाकत मुलींची सुटका
पुणे : स्पा व मसाज सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक विभागाने छापा टाकत पिडीत मुलींची सुटका केली.
लोकेश राजकुमार पुरी (वय २३, रा. चौधरी वस्ती, खराडी) याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. याप्रकरणी महिला सहायक फौजदार छाया जाधव यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पिटा अॅक्ट ३, ४, ५ व भारतीय न्याय संहिता १४३, ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खराडी येथील राजाराम पाटील नगरमध्ये असलेल्या फॉरच्यून प्लाझा बिल्डिंगमध्ये मसाज सेंटर सुरू असून याठिकाणी बेकायदा वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार, अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक विभागाने याठिकाणी सोमवारी संध्याकाळी छापा टाकला. याठिकाणी आरोपी पिडीत मुलींना आर्थिक आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याचे समोर आले. त्याला ताब्यात घेऊन पिडीत मुलींची सुटका करण्यात आली. पुढील तपास खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण करीत आहेत.