
खराडीत मसााज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय
गेल्या तीन दिवसात चार मसाज पार्लरवर पोलिसांची कारवाई
पुणे : खराडी भागातील अशोकानगर येथील एका इमारतीत सन शाईन स्पा येथे मसाज पार्लरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
संदीप चव्हाण, रोहित शिंदे, गोपाळ तसेच स्वाती ऊर्फ श्वेता विजय शिंदे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलीस अंमलदार वर्षा सावंत यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर-खराडी भागातील अशोकानगर बिल्डिंगमधील एका फिटनेस क्लबजवळ असलेल्या इमारतीत सन शाईन स्पा आहे. या स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती चंदननगर पोलिसांना मिळाली. या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठविले. या ग्राहकाने इशारा करताच २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पोलिसांनी सन शाईन स्पावर छापा टाकला. मसाज पार्लरमधून तरुणींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत मसाज पार्लरमधील तरुणींना आरोपींनी जादा पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे तपास करत आहेत.
शहर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. पोलीस आयुक्तांनी मसाज पार्लरमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकारांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. गेल्या चार दिवसात पोलिसांनी तीन मसाज पार्लरवर छापे टाकून कारवाई केली आहे. मार्केटयार्ड, तसेच पुणे-सातारा रस्त्यावरील धनकवडी भागातील मसाज पार्लरवर कारवाई करून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.



