
अल्पवयीन मुलीकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेणे भोवले
पुणे : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बेकायदा धंद्यांबाबत नो टॉलरन्स” धोरण अवलंबलेले आहे. एका कुंटणखाना चालक महिलेसह तिच्या साथीदारांना दणका दिला असून अल्पवयीन मुलीकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेण्यात येत असलेला कुंटणखाना तीन वर्षांकरिता सीलबंद करण्यात आला आहे.
फरासखाना पोलीस ठाण्यात कुंटणखान्याची मॅनेजर बबीता मोहम्मद शबीर शेख (वय ६१, रा. ९९४, बुधवार पेठ), कुंटणखाना चालक चंपा ऊर्फ विष्णुमाया दिनेश लामा (वय ५१, रा. नवीन बिल्डींग, तीसरा मजला, ९९४, बुधवार पेठ, मुळगाव झेब्रांग, नवकोट, नेपाळ) यांच्यावर बीएनएस कलम १४४, ९६, ९८,९९, ३(५), ३५१(२), ११५(२),१२७(४),१३७ (२),६४,४९, पोक्सो अॅक्ट कलम ४,१७ व अनैतिक मानवी वाहतुक, व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चेकलम ३,४,५,६,७ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता. याप्रकरणी बबिता आणि चंपा यांना अटक करण्यात आलेली आहे. या दोघींनी बांग्लादेशी असलेल्या अल्पवयीन मुलीकडून जबरदस्तीने वेश्यव्यवसाय करवून घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली होती. या व्यवसायाचे ठिकाण सील करण्याबाबत पोलीस आयुक्तांनी आदेश दिले होते.
हे कुंटणखाना असलेले ठिकाण सील करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी अनैतिक व्यापर (प्रतिबंध) अधिनियम १९५६ चे कलम १८ (९)(३७) अन्वये तत्कालीन पोलीस उप आयुक्त संदिपसिंह गिल्ल, व अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्फत पोलीस आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अमितेश कुमार यांना सादर केला होता. पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची सुनावणी घेऊन या कुंटणखान्यामधून आरोपींना निष्कासीत करून तो ०३ वर्षांकरीता सील बंद करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे २८ जुलै रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी हा कुंटणखाना दोन पंचासमक्ष सीलबंद केला. ही कारवाई पोलीस उप आयुक्त कृषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.