
पूर्वपरवानगीशिवाय बसमध्ये चित्रीकरण, गणवेश व ई-मशीनचा गैरवापर केल्याचा आरोप
पुणे : पुण्यातील सोशल मीडियावर लोकप्रिय असलेला रील स्टार अथर्व सुदामे याला पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पीएमपीच्या बसमध्ये कोणतीही पूर्वपरवानगी न घेता रील शूट करून ती इन्स्टाग्रामवर प्रसारित केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
पीएमपीएमएल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित रीलमध्ये महामंडळाचा अधिकृत गणवेश, ई-तिकीट मशीन, बॅच-बिल्ला यांचा बेकायदेशीर वापर करण्यात आला आहे. तसेच या रीलमधून महिला प्रवाशांचा अवमान होईल असे अपमानास्पद चित्रण करण्यात आल्याचा गंभीर आरोप प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
महामंडळाच्या प्रतिमेला धक्का?
पीएमपीएमएलच्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे की, अशा प्रकारच्या रील्समुळे महिला प्रवाशांच्या सन्मान, प्रतिष्ठा व मानसिक सुरक्षिततेला बाधा पोहोचत असून सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या हक्कांवर परिणाम होत आहे. याशिवाय, या प्रकारामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाची जनमानसातील प्रतिमा मलिन होत असून, महामंडळाच्या अंतर्गत नियम व धोरणांचे उल्लंघन झाले आहे.
तसेच सार्वजनिक बस सेवेवरील प्रवाशांचा विश्वास व महामंडळाच्या व्यावसायिक हितावरही याचा विपरित परिणाम होत असल्याचे नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. ही नोटीस मुख्य परिवहन व्यवस्थापक (ऑपरेशन), पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आली आहे.
सात दिवसांत खुलासा देण्याचे आदेश
पीएमपीएमएल प्रशासनाने अथर्व सुदामेला नोटीसमार्फत आदेश दिले आहेत की, संबंधित आक्षेपार्ह रील तात्काळ इन्स्टाग्रामवरून हटवावी. भविष्यात पीएमपीएमएलच्या बससेवेबाबत कोणतेही फोटो, व्हिडिओ, रील किंवा मजकूर महामंडळाच्या सक्षम प्राधिकरणाची लेखी परवानगी घेतल्याशिवाय सोशल मीडियावर प्रसारित करू नये. नोटीस प्राप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मुख्य कार्यालयात (शंकरशेठ रोड, स्वारगेट) लेखी खुलासा सादर करावा.
कायदेशीर कारवाईचा इशारा
जर दिलेल्या मुदतीत खुलासा सादर करण्यात आला नाही किंवा संबंधित रील हटविण्यात कसूर झाली, तर प्रचलित कायदे व नियमांनुसार पुढील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पीएमपीएमएल प्रशासनाने दिला आहे.







