
लगट करण्याचा प्रयत्न : वारंवार मोबाईल क्रमांक मागून दिला त्रास
पुणे : पीएमपी बसमधून स्वारगेट ते कात्रज दरम्यान बसच्या वाहकाने एका अल्पवयीन मुलीचा (वय १७) विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या शाळकरी मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न करीत तिच्याकडे वारंवार मोबाईल क्रमांकाची मागणी केली. याबाबत तिने आईला प्रकार सांगितला. त्यानंतर, सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २८ मार्च रोजी सव्वासात ते साडेसात वाजण्याच्या दरम्यान घडली.
आरीफ जलील शेख (वय ३५, रा. चौधरीनगर, विश्रांतवाडी) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर भान्यास ७४, सह बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम ८ व १२ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. आरोपी पीएमपीएमएलच्या वाघोली डेपोवर नेमणुकीस होता. कात्रज-स्वारगेट मार्गावरील बस घेऊन तो निघालेला होता. या बसमधून पिडीत मुलगी प्रवास करीत होती.
आरोपी आरीफ शेख याने कात्रज पीएमपीएमएल बस डेपो ते डीमार्ट, पुणे सातारा रोडपर्यंतच्या प्रवासादरम्यान पिडीत मुलीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत तिच्याकडे मोबाईल क्रमांक मागितला. तिच्याकडून नंबर घेण्याचा प्रयत्न केला. तसेच तीने तो देण्यास असमर्थता दर्शविली असता वाईट उद्देशाने खांद्याला तसेच पाठीला स्पर्श करून तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.





