
अग्निशामक दलाच्या जवानांनी दाखवली तत्परता
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या स्वारगेट आगारामधील कार्यशाळेत (वर्कशॉप) दुरुस्तीसाठी आणलेल्या बसने पेट घेतला. ही घटना शनिवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास घडली. सुरुवातीला पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी चारही बाजूंनी पाण्याचा मारा करून ही आग पूर्णपणे विझवली.
अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षाला स्वारगेट बस डेपोमध्ये असलेल्या वर्कशॉपमध्ये पीएमपी बस पेटल्याची माहिती मिळाली. दलाच्या गंज पेठेतील मुख्यालयामधील अग्निशमन वाहन तात्काळ घटनास्थळी पाठविण्यात आले. घटनास्थळी दाखल झालेल्या जवानांनी बसला पुढच्या बाजूने आग लागल्याचे पाहिले. त्यांनी चारही बाजूंनी पाण्याचा मारा सुरू केला. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामधून अवघ्या दहा मिनिटात ही आग पूर्णपणे विझवण्यात यश आले. या आगीमध्ये बसचा पुढील भाग पूर्णपणे जाळाला असून बरेच नुकसान झाले आहे. बसला ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नसल्याचे अग्निशामक दलाच्या जवानांनी सांगितले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. या कामगिरीत प्रभारी अग्निशमन अधिकारी प्रशांत गायकर, वाहनचालक अतुल मोहिते व फायरमन चंद्रकांत गावडे, आजीम शेख, सागर ठोंबरे, मयुर ठुबे, तुषार जानकर यांनी सहभाग घेतला.