
पाषाण आणि येरवडा भागात घडल्या दोन घटना
पुणे : पाळीव श्वानांना अंगावर सोडून नागरिकांवर हल्ला करण्यात आल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी येरवडा आणि बाणेर पोलीस ठाण्यामध्ये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
येरवडा पोलीस ठाण्यामध्ये रमजान आमिन कुरेशी (वय ३२, रा..नागपूर चाळ, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बॉबी डाडर (वय ३०), यश डाडर (वय २८, दोघेही रा. एअरपोर्ट रोड, नागपूर चाळ, येरवडा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत..त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता २९१, ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नागपूर चाळ पहिल्या गल्लीच्या तोंडावर चहा पीत उभे होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये आणि आरोपींमध्ये चेष्टा मस्करी सुरू होती.
आरोपींना चिडवल्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यावेळी आरोपी बॉबी याने त्यांच्या नाकावर बुक्का मारून त्यांना जखमी केले. त्यानंतर त्यांचा पाळीव कुत्रा फिर्यादीच्या अंगावर सोडला. त्यावेळी या कुत्र्याने फिर्यादीच्या डाव्या मांडीचा चावा घेतला. तसेच बॉबी याने हत्यार हातामध्ये घेऊन जोरजोरात आरडाओरडा करून शिवीगाळ करीत फिर्यादीला बघून घेण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
तर, दुसरी घटना पाषाण टेकडी या ठिकाणी घडली. याप्रकरणी शैल अरविंद रावण (वय ५२, रा..अनुसया रेसिडेन्सी, सुस रोड, पाषाण) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी माधवी सुरेंद्र बडगुजर (वय ४५, रा. श्री लक्ष्मी धाम सोसायटी, सुतारवाडी) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २९१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची पत्नी पाषाण टेकडीवर मॉर्निंग वॉक करण्याकरिता गेले होते. त्यावेळी माधवी बडगुजर या त्यांच्या श्वानाला फिरवत होत्या. त्यांच्याकडे लॅब्रॉडॉर जातीचा पाळीव कुत्रा आहे. या श्वानाला त्यांनी मोकळे सोडलेले होते. या श्वानाने फिर्यादीवर हल्ला करून त्यांना जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मानवी जीवाला होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून संरक्षण न करता तसेच पुरेशी उपाय योजना त्यांनी केलेली नव्हती. तसेच, हे श्वान कोणाच्यातरी अंगावर जाऊन त्याचा चावा घेण्याची शक्यता असतानाही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.