
कोथरूड–बावधनमध्ये ‘गांधीगिरी’द्वारे जनजागृती
पुणे : “स्वच्छ भारत अभियान” आणि “स्वच्छ सर्वेक्षण मिशन 2025-26” अंतर्गत कोथरूड–बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे श्वानमालकांसाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली. सार्वजनिक रस्त्यावर श्वानांनी केलेली शी न उचलणाऱ्या १० श्वानमालकांवर ५०० रुपये प्रत्येकी, अशा एकूण ५,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
डहाणूकर कॉलनी, कमिन्स रोड, गोपीनाथ नगर, गांधीभवन परिसर, आशिष गार्डन, परमहंस नगर, म्हातोबा नगर, शिवतीर्थ नगर अशा भागांमध्ये सकाळच्या वेळी फिरायला येणाऱ्या श्वानमालकांना थांबवून जनजागृती करण्यात आली. विशेष म्हणजे, कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी श्वानमालकांशी वाद घालण्याऐवजी गुलाब पुष्प देत सौम्य पद्धतीने त्यांना स्वच्छता नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
पूपस्कूपचा वापर बंधनकारक
अनेक तक्रारी नागरिकांकडून ऑनलाइन होत असल्याने श्वानांनी सार्वजनिक रस्त्यावर शी केल्यास ती संबंधित मालकांनी त्वरित उचलणे बंधनकारक आहे. यासाठी पूपस्कूपचा वापर अनिवार्य आहे. श्वानांना फिरविताना सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असल्याच्या सूचना श्वानमालकांना देण्यात आल्या.
ही मोहिमेत घनकचरा व्यवस्थापन विभगाचे उपायुक्त अविनाश सकपाळ, परिमंडळ २ चे उपायुक्त संतोष वारूळे, सहाय्यक आयुक्त सुहास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे, गणेश खिरीड, करण कुंभार, किरण जाधव, दत्तात्रय दळवी, राजेश आहेर, प्रमोद चव्हाण, लक्ष्मीकांत कुलकर्णी, गणेश साठे, गणेश चोंधे, जया सांगडे, वैजीनाथ गायकवाड, अण्णा ढावरे, अशोक कांबळे, साईनाथ तेलंगी यांनी सहभाग घेतला.
नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींना प्रतिसाद
सकाळच्या वेळी रस्त्यावर वॉकिंग करणाऱ्या नागरिकांना श्वानांच्या शीमुळे होणारा त्रास लक्षात घेऊन ही मोहीम हाती घेण्यात आली. कोथरूड परिसरातील स्वच्छता प्रेमी नागरिक महानगरपालिकेकडे तत्परतेने तक्रारी करत असल्याने त्याची दखल घेऊन कारवाई करण्यात आली.
मोहीम अधिक गतिमान होणार
महापालिका सहाय्यक आयुक्त सुहास जाधव, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे आणि गणेश खिरीड यांच्या पुढाकाराने ही मोहीम सुरू करण्यात आली असून पुढील काळात कोथरूड भागात अधिक व्यापक पद्धतीने जनजागृती आणि दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक आरोग्य कोठीअंतर्गत आरोग्य निरीक्षक, मोकादम, एक सेवक असे स्वतंत्र पथक तयार करून परिसरात गस्त आणि कारवाई करण्यात येणार आहे.






