
तत्कालीन यूपीए सरकार, राष्ट्रविरोधी राजकारणी, काही भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांनी तथाकथित ‘भगवा आतंकवाद’चा भ्रम निर्माण केल्याचा आरोप
पुणे : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सुमारे १० वर्षे तुरुंगात काढलेले लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह साध्वी प्रज्ञा सिंहची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या पार्श्वभूमीवर पतित पावन संघटनेने पुरोहित यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत तत्कालीन काँग्रेस-यूपीए सरकारवर जोरदार टीका केली आहे. पुरोहित यांच्या घरासमोर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
पतित पावन संघटनेचे शहराध्यक्ष स्वप्निल नाईक यांनी सांगितले की, “देशभक्त असलेल्या कर्नल पुरोहित यांना खोट्या आरोपांखाली तुरुंगात डांबणे, त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करणे, हा एक सखोल षडयंत्राचा भाग होता. तत्कालीन यूपीए सरकार, राष्ट्रविरोधी राजकारणी व काही भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांनी हिंदू समाजाला बदनाम करण्यासाठी तथाकथित ‘भगवा आतंकवाद’चा भ्रम निर्माण केला. पण आज न्यायालयाने सत्याला न्याय दिला आणि खरे देशभक्त समाजासमोर स्पष्ट झाले.”
त्यांनी पुढे सांगितले की, ‘पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने केलेल्या सिंदूर ऑपरेशनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून काँग्रेसनेच आपल्या राष्ट्रविरोधी भूमिकेचे दर्शन घडवले होते. आता हे पूर्ण प्रकरण एक देशविरोधी कट होता, हे उघड झाले आहे.’ संघटनेने सरकारकडे मागणी केली की, या षडयंत्रामागील सर्व जबाबदार नेते, पोलीस अधिकारी आणि संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, यासाठी स्वतंत्र एसआयटी नेमून सखोल सत्यशोधन करण्यात यावे.
यावेळी महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख राजेश मोटे, कामगार महासंघाचे मयूर माने, रविंद्र भांडवलकर, यादव पुजारी, योगेश शिंदे, दिनेश कुसाळकर, राजेश मकवान, अजय घारे, स्वप्निल आंग्रे, राजाभाऊ कारकुड, विजय क्षीरसागर, अजिंक्य गालिंदे, अमृता देवकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. भारतमाता की जय! वंदे मातरम!” अशा घोषणांनी कार्यक्रमाचा समारोप झाला.