
२०० बनावट कॉल सेंटरवर कारवाई
नवी दिल्ली : कंबोडियामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन फसवणूक रॅकेटचा भंडाफोड करत प्रशासनाने मोठी कारवाई केली असून सुमारे २०० बनावट कॉल सेंटर बंद करण्यात आली आहेत. हजारो लोक इमारतींमध्ये बसून विविध देशांतील नागरिकांना फोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून फसवत असल्याचे उघड झाले आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, छापेमारीदरम्यान अनेक प्रमुख सूत्रधारांना अटक करण्यात आली असून हजारो संशयितांना देशाबाहेर पाठवण्यात आले आहे.
छाप्यादरम्यान एका ठिकाणी भारतीय पोलिस स्टेशनप्रमाणे बनवलेली खोली आढळून आली. त्या ठिकाणी महात्मा गांधींचा फोटो आणि भारताशी संबंधित चिन्हे लावण्यात आली होती. समोरच्या व्यक्तीला आपण भारतीय पोलिस किंवा सरकारी अधिकाऱ्यांशी बोलत आहोत, असा विश्वास निर्माण करून फसवणूक करण्यासाठी ही युक्ती वापरली जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले.
व्हिएतनाम सीमेजवळील कम्पोट प्रांतातील एका मोठ्या संकुलात पत्रकारांना अशा खोल्या दाखवण्यात आल्या, जिथे संगणकांच्या रांगा उभारलेल्या होत्या. थायलंडमधील नागरिकांना फसवण्यासाठी सूचना असलेली कागदपत्रे तेथे आढळली. फोन कॉलसाठी स्टुडिओ बूथ तसेच बनावट भारतीय पोलिस स्टेशनही तयार करण्यात आले होते.
कम्पोट प्रांताचे पोलिस प्रमुख माओ चनमोथुरिथ यांनी सांगितले की, इतक्या मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यासाठी त्यांच्या पोलिस दलाकडे पुरेसे मनुष्यबळ नव्हते. “संपूर्ण प्रांतात आमच्याकडे सुमारे १००० पोलिस आणि ३०० लष्करी पोलिस आहेत. मात्र, जेव्हा येथून ६ ते ७ हजार लोक एकाच वेळी बाहेर पडले, तेव्हा त्यांना रोखणे आमच्यासाठी कठीण झाले,” असे त्यांनी नमूद केले.






