
‘फेस रेकग्निशन’ची यंत्रणा असलेले २८०० नवीन कॅमेरे बसविणार : पुणे पोलिसांचा राज्यातील ‘पायलट प्रोजेक्ट’
पुणे : हल्ली कोणत्याही चौकात उभे राहिले की उंच खांबांवर बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे आपल्याकडेच पाहताहेत असा भास प्रत्येक वाहन चालकाला होतो. वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर ऑनलाईन दंड करण्यासोबतच अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात पुण्यातील सीसीटीव्ही कॅमेरे उपयोगी ठरत आहेत. आता यामध्ये पुणे पोलिसांनी पुढचे पाऊल टाकले असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत थेट चेहरा ओळखणारे नवीन कॅमेरे बसविले जाणार आहेत. हा राज्यातील पायलट प्रोजेक्ट असणार आहे. ‘फेस रेकग्निशन’ची यंत्रणा असलेले २८०० नवीन ‘आयपी बेस्ड’ सीसीटीव्ही कॅमेरे शहरात बसविण्यात येणार असून त्याद्वारे प्रत्येक वाहन चालकाचा चेहरा ओळखला जाऊ शकणार आहे. विशेष म्हणजे या यंत्रणेमुळे दहशतवादी, विविध गुन्ह्यांमधील आरोपी, गुन्हेगार यांचे चेहरे लगेचच ‘कॅच’ केले जाणार आहेत. त्यामुळे गुन्हेगारी आणि घातपाती कारवायांना आळा बसण्यास मदत होणार आहे.
पुणे पोलिसांनी काही वर्षांपूर्वी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये शहरातील महत्वाच्या १२४ चौकांत १ हजार ४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. या कामात महापालिकेची देखील मदत घेण्यात आलेली होती. या कॅमेऱ्यांचा वापर मुख्यत्वे वाहतूक नियमन आणि दंड आकारणीकरिता होत आहे. अनेकदा आपघातांची माहिती देखील या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांना मिळते. शहरातील अनेक गंभीर गुन्हे या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे उघडकीस आलेले आहेत. अनेकदा महत्वाचे, सण, उत्सव, मिरवणुका यावर लक्ष ठेवण्याकरिता या कॅमेऱ्यांचा वापर आणि उपयोग होतो. मागील वर्षी वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना आकारलेल्या दंडाची रक्कम जवळपास सव्वाशे कोटींच्या घरात होती. शहरातील ज्या भागात गंभीर गुन्हे, तसेच अपघात घडलेल्या विविध ठिकाणांवर पोलिसांना या निमित्ताने लक्ष ठेवणे अधिक सोईचे झालेले आहे. यासोबतच पुण्यातील महत्वाच्या संस्था, व्यावासायिक, दुकानदारांनी बसवलेले दहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी जोडण्याचे काम देखील सुरू करण्यात आलेले आहे.
नवरात्रोत्सवात चतु:शृंगी मंदिरामध्ये प्रायोगिक तत्वावर ‘आयपी बेस्ड सीसीटीव्ही कॅमेरे’ बसविले होते. या कॅमेऱ्यांचा चांगला उपयोग नऊ दिवसांत झाला होता. सोनसाखळी हिसकावणारे, पाकीटमारी करणारे पाच-सहा आरोपी पकडण्यात यश आले होते. याद्वारे मंदिरात होणाऱ्या चोऱ्या रोखण्यात मदत झाली. आता हेच कॅमेरे शहरातील प्रमुख चौक, महत्वाचे रस्ते, महत्वाच्या इमारती आदी परिसरात लावण्यात येणार आहेत. शहरात आणखी २८०० कॅमेरे बसविण्याचे पूर्ण नियोजन पुणे पोलिसांनी केले असून तसा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. राज्य शासन स्तरावर त्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यासाठी कॅमेरे खरेदीची निविदा प्रक्रिया देखील राबविली जाणार आहे. शहरात आजमितीस १२४ चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. उर्वरित १३५ चौकात नव्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. हे कॅमेरे बसविण्याकरिता महत्वाच्या आणि मोठ्या संस्था, व्यावसायिक, दुकानदार यांची देखील मदत घेतली जाणार आहे.
पुण्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. शरीर आणि मालमत्तेविरुद्धचे गुन्हे वाढत आहेत. गुन्हेगारांची संख्या देखील वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर हे कॅमेरे उपयोगी ठरणार आहेत. गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे अधिक सोईचे होणार आहे. पुण्यामध्ये यापूर्वी जर्मन बेकरी, जंगली महाराज रस्ता, फरासखाना पोलीस ठाणे याठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आलेले आहेत. तसेच, कोंढवा परिसरातून इंडियन मुजाहिदीन, इसिस मोड्यूल उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत. नुकतीच पुणे पोलिसांनी कोथरूडमध्ये कारवाई करीत दोन दहशतवाद्यांना पकडले होते. यासोबतच अनेक नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना पुण्यात अटक करण्यात आलेली होती. विविध गुन्ह्यातील आरोपी, टोळी प्रमुख, गुन्हेगार, फरार आरोपी, दहशतवादी, नक्षलवादी यांचा पुणे पोलिसांकडे असलेला डेटा या प्रणालीमध्ये समाविष्ट केला जाणार आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी हे कॅमेरे बसविले जाणार आहेत त्याच्या कक्षेत आलेले हे सर्व चेहरे क्षणार्धात टिपले जाणार आहेत. त्याचा ‘अलर्ट’देखील पोलिसांना मिळणार आहे.
पुणे पोलिसांनी ‘आयपी बेस्ड सीसीटीव्ही कॅमेरे’ बसविण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला दिला आहे. यामध्ये ‘फेस रेकग्निशन’ची सुविधा असणार आहे. त्यामुळे गुन्हेगार, फरार आरोपी, दहशतवादी, नक्षलवादी आदी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती मिळू शकणार आहे. वाहतूक नियोजन-गुन्हेगारीचे नियंत्रण आणि सुरक्षा अशा अनेक आयामांवर याद्वारे काम करणे सोपे होणार आहे. त्यासाठी राज्य शासनामार्फत निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. हा राज्यातील पायलट प्रोजेक्ट आहे. आम्ही नवरात्र उत्सवात प्रायोगिक तत्वावर चतु:शृंगी मंदिरात हे कॅमेरे बसविले होते. त्यामुळे पाच सहा चोर आमच्या हाती लागले. आता हा प्रकल्प पूर्ण शहरात राबविला जाणार आहे.