
पोलिसांकडून छापा टाकून दोघांना अटक; सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : कुख्यात मटका किंग नंदू नाईक याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. ‘ड्राय डे’च्या दिवशी बेकायदेशीर पद्धतीने मद्य विक्री करताना त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल एक लाख दहा हजार ४०० पाच रुपयांचा देशी-विदेशी कंपन्यांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी, २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शुक्रवार पेठेतील शाहू चौकात असलेल्या रोनक बार जवळ घडली.
नंदू नाईक (रा. रोनक बार, शाहू चौक, शुक्रवार पेठ), वैभव विजय डोंगरे (वय २६, रा. शाहू चौक, शुक्रवार पेठ, मूळ अमरावती), गुड्डूकुमार भोलाकुमार (वय २६, रा. रोनक बार, शुक्रवार पेठ, मूळ उत्तर प्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई आशिष चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा कलम ६५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडक पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गस्त घालित होते. त्यावेळी पोलीस कर्मचारी आशिष चव्हाण यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत नंदू नाईक हा रोनक बार येथील पार्किंगमध्ये विदेशी आणि देशी कंपनीच्या दारूची बेकायदेशीर विक्री करत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला. त्यावेळी आरोपी या ठिकाणी वेगवेगळ्या बॉक्समध्ये देशी विदेशी कंपनीच्या मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. त्यांच्याकडे ही दारू विकण्याचा कोणताही परवाना आढळून आला नाही. पोलिसांनी आरोपींकडून काही रक्कम आणि मोबाईल देखील जप्त केला आहे. हा सर्व माल आरोपी नंदू नाईक यानेच विक्रीसाठी त्या दोघांकडे दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप व्हटकर, कुदळे, पोलीस उपनिरीक्षक कांबळे, पोलीस हवालदार हर्षल दुडम, ठवरे, फरांदे, आशिष चव्हाण, नदाफ, दिवटे, गोरे यांच्या पथकाने केली.
#PunePolice #IllegalLiquor #DryDayRaid #NanduNaik #PuneCrimeNews #GaneshChaturthi #PuneNews #Shahupeth #RonakBar #PoliceAction