
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर एकटा उभा ठाकला; वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू
#मेलबर्न : भारतीय संघाचा तारणहार ठरलेल्या नितीश रेड्डीने उत्कृष्ट फलंदाजी करत आपले पहिले कसोटी शतक झळकावले आहे. नितीश रेड्डीने ९९ धावांवर असताना बोलँडच्या गोलंदाजीवर दणदणीत चौकार लगावत आपले कसोटी शतक पूर्ण केले. नितीशने १७३ चेंडूत १० चौकार आणि एका षटकारासह १०३ धावांची अद्वितीय खेळी केली. नितीशचे शतक पूर्ण होताच त्याच्या वडिलांनी एकच जल्लोष केला आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.
नितीश रेड्डी ९७ धावांवर असताना वॉशिंग्टन सुंदर बाद झाला. यानंतर मैदानात आलेला जसप्रीत बुमराह २ चेंडू खेळत बाद झाल्याने ८ वी विकेट पडली. यानंतर मोहम्मद सिराज मैदानावर आला. मोहम्मद सिराज किती चेंडू खेळू शकेल, याची सर्वांनाच चिंता होती, पण सिराजने बचावात्मक फलंदाजी करत कमिन्सचे षटक खेळून काढले आणि पुढच्या षटकात नितीश रेड्डीला स्ट्राईक दिली. नितीश रेड्डीने एक डॉट बॉल खेळत पुढच्या चेंडूवर चौकार लगावत शतकाचे स्वप्न पूर्ण केले.
२१ वर्षीय नितीश रेड्डीच्या शतकामुळे भारताने चांगली धावसंख्या उभारली आहे. नितीश रेड्डीने वॉशिंग्टन सुंदरबरोबर १२७ धावांची मोठी भागीदारी रचली. सुंदर आणि नितीश रेड्डीची ही ८ व्या विकेटसाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची दुसरी सर्वात मोठी भागीदारी आहे. वॉशिंग्टन सुंदरनेही नितीशच्या जोडीने अर्धशतक पूर्ण केले. मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने १५९ धावांवर ५ विकेट गमावल्या. तिसऱ्या दिवसाची सुरुवातही चांगली झाली नाही. पहिल्या सत्रात भारताने महत्त्वाच्या विकेट गमावल्या. १९१ धावांवर ऋषभ पंत खराब शॉट खेळून बाद झाला, यानंतर जडेजालाही नाथन लायनने बाद करवत तिसऱ्या दिवशी भारताला धक्का दिला. यानंतर मैदानावर आलेल्या नितीश रेड्डीने भारताचा डाव उचलून धरला. पहिल्यांदा त्याने वॉशिंग्टन सुंदरबरोबर चांगली भागदारी रचत आणि बचावात्मक तसेच संधी मिळताच आक्रमक फटके खेळत भारताचा फॉलोऑन वाचवला. यानंतर रेड्डीने आपले अर्धशतक पूर्ण केले.
ऐतिहासिक शतक
नितीश कुमार रेड्डी बॉक्सिंग डे कसोटीत शतक झळकावणारा सर्वात तरुण भारतीय ठरला आहे. नितीशने वयाच्या २१ वर्षे २१६ दिवसांत ही कामगिरी केली आहे. याआधी कार्ल हूपरने वयाच्या २१ व्या वर्षी ०११ दिवसांत बॉक्सिंग डे कसोटीत शतक झळकावले होते. ९९ धावांवर नितीश नॉन-स्ट्रायकर एंडवर असताना आणि मोहम्मद सिराज स्ट्राइकवर असताना आणि भारताची फक्त एक विकेट शिल्लक असताना ग्रिलख्रिस्टने त्याला काय वाटत आहे, असे विचारले. यावर उत्तर देताना नितीशचे वडील म्हणाले, सर खूप टेन्शन होते. शेवटची विकेट बाकी होती आणि सिराज स्ट्राइकवर होता, टेन्शन होते, खूप टेन्शन होते.