
पुणे : हवेली तालुक्यातील वडकी ग्रामपंचायत हद्दीत किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसन झटापटीत झाल्याने एकाच्या डोक्यात दगड घालून खून (Murder) केल्याची घटना घडली होती. ही घटना १७ एप्रिल २०१९ रोजी पवार मळा परिसरात असलेल्या गोडाऊनजवळ घडली होती. या गुन्ह्यातील आरोपीला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने (Pune District Court) सात वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा (Conviction) ठोठाविली आहे. हे आदेश पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी.पी.जाधव यांनी दिले आहेत.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत चंद्रकांत शंकर चव्हाण (वय ६८, रा. पांडवनगर बडकी ता. हवेली जि. पुणे) यांचा खून झाला होता. याप्रकरणी त्यांचा मुलगा रमेश चंद्रकांत चव्हाण (वय ४०, रा. पांडवनगर वडकी ता. हवेली जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. यांवरून भिमराव यशवंत खांडे (वय ५५, रा वडकी, खोकेनगर, ता. हवेली, जि. पुणे मुळ गाव गिरवी ता. फलटण,जि. सातारा) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी रमेश चव्हाण यांचे वडील चंद्रकांत चव्हाण हे लग्नाला जातो, असे म्हणून दुचाकीवरून १७ एप्रिल २०१९ रोजी गेले होते. त्यादिवशी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास रमेश चव्हाण यांच्या शेजाऱ्याने तुझे वडील हे पवार मळा परिसरात असलेल्या गोडाऊनजवळ रस्त्यावर पडले असून त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. असे सांगितले. त्यानंतर रमेश चव्हाण हे सदर ठिकाणी गेले असता, वडील मृतावस्थेत आढळून आले.
रमेश चव्हाण यांनी आसपास चौकशी केली असता, चंद्रकांत चव्हाण व एक अनोळखी इसम यांची भांडणे झाली आहेत. त्यांची बराचवेळ झटापट चालली होती. त्यावेळी सदर अनोळखी इसमाने चंद्रकांत चव्हाण यांच्या डोक्यात दगड घातला. चंद्रकांत चव्हाण खाली रस्त्यावर पडले. व त्यानंतर मारहाण करणारा अनोळखी इसम तेथुन निघुन गेला. याप्रकरणी रमेश चव्हाण यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली होती. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात भारतीय दंड विधायक कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी त्वरित अनोळखी इसमाची ओळख पटवून भिमराव खांडे याला अटक केली होती. अटक केल्यानंतर खटला शिवाजीनगर येथील पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात सरकारच्या वतीने अॅ ड. नामदेव तरळगटटी यांनी केस लढविली. या खटल्यात तरळगटटी यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी भिमराव खांडे याला सात वर्षाची सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हे आदेश न्यायाधीश पी.पी.जाधव यांनी दिले आहेत.
या खटल्यात सरकारी वकील अॅ ड. नामदेव तरळगटटी यांना सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा विठ्ठल उदमले, सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप गोविंद पवार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र भाऊराव पन्हाळे, पोलीस हवालदार ललिता सिताराम कानवडे, रेश्मा महेश कांबळे, वैजनाथ शेलार व प्रशांत कळसकर यांची बहुमुल्य मदत झाली.