
तीन वर्षांच्या मुलाला सोडले आळंदीत
#पुणे : ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या करून तिच्या तीन वर्षांच्या मुलाला आळंदी येथे बेवारस अवस्थेत सोडून आरोपी पसार झाला. महिलेचा मृतदेह खंबाटकी टाकून दिल्यावर तो स्वतः पोलीस ठाण्यात गेला. त्याने प्रेयसी बेपत्ता झाल्याची नोंद केली. दरम्यान, संबधित महिलेच्या वर्णनाशी मुळताजुळता मृतदेह खंबाटकी घाटात मिळाला आणि या खुनाचा उलगडा झाला. त्यानंतर पोलिसांना तिच्या ‘लिव्ह इन पार्टनर’ला बेड्या ठोकल्या. सतत पैसे मागणे आणि चारित्र्याच्या संशयावरून हा खून करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
जयश्री मोरे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी दिनेश ठोंबरे याला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश आणि जयश्री हे दोघे मागील पाच वर्षांपासून वाकडमध्ये ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होते. त्यांना तीन वर्षाचा मुलगा देखील आहे. दिनेश विवाहित आहे. त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुलं आहेत. जयश्रीचा सात वर्षांपूर्वी विवाह झालेला होता. ती पतीपासून विभक्त रहात होती. ती दिनेशसोबत राहात होती. या दोघांमध्ये देखील मागील अनेक दिवसांपासून विसंवाद सुरू झाला होता. ती त्याच्याकडे नेहमी पैशांची मागणी करत होती. तसेच, पत्नीपासून वेगळं होऊन एकत्र राहायचा आग्रह धरीत होती.
या दोघांमध्ये २४ नोव्हेंबर रोजी भुमकर चौकात गाडीमध्येच वाद झाले. त्याचवेळी दिनेशने गाडीतच हातोडीने तिच्या डोक्यात घाव घालून खून केला. तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने गाडी साताऱ्यातील खंबाटकी घाटात नेली. त्या ठिकाणी मृतदेह फेकून दिला. तो पुन्हा पिंपरी- चिंचवडमध्ये आला. त्यानंतर, २५ नोव्हेंबर रोजी जयश्री बेपत्ता झाल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात दिली.
दरम्यान, तिच्या वर्णणाशी मिळत्याजुळत्या महिलेचा मृतदेह खंबाटकी घाटात आढळून आल्याची बातमी वाकड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान केली. या खुनामागे दिनेश असल्याचे समोर आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली. या तपासात त्याने ‘लिव्ह इन’मध्ये असताना जन्माला आलेल्या तीन वर्षीय मुलाला आळंदीत बेवारस सोडून दिले होते. त्या मुलीचा शोध सुरू आहे.