
पुणे : महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग (झोन क्र. ३) तर्फे शुक्रवारी (२९ ऑगस्ट) बालेवाडी आणि बाणेर परिसरात अतिक्रमणविरोधी मोठी मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत दोन मजली आरसीसी इमारतीसह एकूण १४,६५० चौ.फुट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.
पेठ बालेवाडीतील सर्व्हे नंबर ३२ मध्ये उभारलेली दोन मजली आरसीसी इमारत जॉ कटरच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. संबंधित बांधकामासाठी मनपाकडून कोणतीही परवानगी न घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर थेट कारवाई करण्यात आली.
बाणेर मुख्य रस्ता आणि पॅन कार्ड क्लब रोड परिसरात उभारलेली अनधिकृत दुकाने, हॉटेल्स, पत्राशेड आणि पक्क्या स्वरूपातील बांधकामांवरही पालिकेने घणाघाती हल्ला चढवला. या भागातील रस्त्यालगतची अनधिकृत बांधकामे वाहतुकीस अडथळा ठरत असल्याने स्थानिकांकडून तक्रारी येत होत्या.
कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पालिकेच्या पथकाच्या मदतीला पोलिसांचा मोठा ताफा सोबत होता. सहायक पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी संपूर्ण परिसरात सुरक्षा पुरवली.
ही कारवाई पालिकेचे झोन ३ चे अधिक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. उपअभियंता, कनिष्ठ अभियंता व अन्य कर्मचाऱ्यांसह एक जेसीबी, एक गॅस कटर आणि दहा अतिक्रमण कर्मचारी यांचा वापर करण्यात आला. अधिकृत परवानगी न घेता केलेल्या बांधकामांविरोधात कठोर पावले उचलण्याची भूमिका पालिकेने घेतली असून “अनधिकृत बांधकामांना शहरात मोकळीक देणार नाही,” असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. या धडक मोहिमेनंतर बालेवाडी व बाणेर परिसरातील इतर अनधिकृत बांधकामधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
#PuneAntiEncroachment #BalevadiBaner #PuneDemolitionDrive #UnauthorizedConstruction #PMCAction #RCCBuildingDemolition #CityDevelopmentPune #PuneUrbanPlanning #PunePoliceSupport #IllegalConstruction