
रेवती सुळे आणि सारंग लखानी लवकरच विवाहबंधनात
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या लेकी रेवती सुळे यांचा विवाह निश्चित झाला असून लवकरच सुळे कुटुंबात लगीनघाई सुरू होणार आहे. रेवती सुळे यांचा विवाह सारंग अरुण लखानी यांच्याशी ठरल्याची माहिती समोर आली आहे.
रेवती सुळे यांचे बंधू विजय सुळे यांनी सोशल मीडियावर रेवती आणि सारंग यांचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्याने या सोयरिकीची अधिकृत चर्चा सुरू झाली. तसेच माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत या बातमीची माहिती दिली आहे.
खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांना दोन अपत्ये असून मुलगी रेवती आणि मुलगा विजय सुळे अशी त्यांची नावे आहेत. रेवती सुळे यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण पूर्ण केले आहे. त्या अनेकदा सुप्रिया सुळे यांच्यासोबत राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यामुळे चर्चेत आल्या आहेत.
सुळे आणि लखानी कुटुंबात ही सोयरीक जुळली असून रेवती सुळे नागपूरच्या लखानी कुटुंबाची सून होणार आहे. विवाहाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. सारंग अरुण लखानी हे बॅडमिंटनपटू असून त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. ते उद्योजक अरुण लखानी यांचे पुत्र असून अरुण लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत.







