
विमानतळ पोलिसांची कारवाई, तिघीकडून जप्त केला ३० हजारांचा गांजा
पुणे : एकाच कुटुंबातील त्या तिघी जणी खुळेवाडी येथील मैदानाच्या एका कोपर्यात बसल्या होत्या. विमाननगर पोलिसांना यांची माहिती मिळाली. पोलिसांनी छापा टाकून तिघींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्या सासू, सून आणि बहिण असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्याकडे ३० हजार रुपयांचा १ हजार ५६० ग्रॅम गांजा मिळून आला. तिघी जणी एकत्र गांजा विक्री करत असल्याचे आढळून आले.
सासु सोनाबाई अंकुश पवार (वय ५०, रा. लक्ष्मीमाता मंदिराजवळ, खुळेवाडी), सुन सुवर्णा अशोक पवार (वय २५) आणि बहिण शालन कांतीलाल जाधव (वय ४५, रा. लक्ष्मीमाता मंदिराजवळ, खुळेवाडी) अशी या महिलांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ पोलीस ठाण्याचे तपास पथक २५ सप्टेंबर रोजी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की, खुळेवाडी येथे काही महिला गांजा विक्री करीत आहेत. या बातमीच्या अनुशंगाने पोलिसांनी सापळा रचून तिघा महिलांना पकडले. त्यांच्याकडून ३० हजार रुपयांचा १५६० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या महिलांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये एनडीपीएस अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या तीनही महिला रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी दोन ते तीन गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड तपास करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार सना शेख, लालु कर्हे, हरीप्रसाद पुंडे, रुपेश पिसाळ, शैलेश नाईक, ऋषिकेश चांदेकर, अंकुश जोगदंडे, योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, सचिन मांजरे, दादासाहेब बर्डे यांनी केली आहे.