
सातवीमधील विद्यार्थ्याचे धक्कादायक कृत्य : प्रकार लपविणाऱ्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर गुन्हा
पुणे : शाळेच्या प्रगती पुस्तकावर पालकांची खोटी सही केल्याची तक्रार शिक्षकांकडे केल्याच्या रागातून एका विद्यार्थ्याने एका विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिचा खून करण्यासाठी चक्क १०० रुपयांची सुपारी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ही सुपारी त्याच शाळेत नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला देण्यात आल्याचे देखील समोर आले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर कारवाई करण्याऐवजी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार दौंड येथील एका नामांकित शाळेत घडला.
संबंधित मुलीच्या वडिलांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दौंड येथील एक इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये ही विद्यार्थिनी सातवीमध्ये शिकण्यास आहे. सातवीच्या दुसऱ्या तुकडीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने त्याच्या प्रगती पुस्तकावर पालकांची सही आणणे अपेक्षित असताना त्याने पालकांची खोटी सही केली. हा प्रकार या विद्यार्थिनीने पाहीला. तिने हा प्रकार शिक्षकांना सांगितला. त्यामुळे शिक्षक या विद्यार्थ्यावर ओरडले. त्याचा राग या विद्यार्थ्याला आला.
या मुलाने नववीमधील एका विद्यार्थ्याला गाठले. त्याला १०० रुपये दिले. शिक्षकांकडे तक्रार केलेल्या विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिचा खून करण्याची सुपारी त्याने या विद्यार्थ्याला दिली. नववीमधील मुलाने हा प्रकार संबंधित मुलीला जाऊन सांगितला. या मुलीने हा प्रकार वर्ग शिक्षकांना सांगितला. त्यानंतर, शिक्षकांनी प्राचार्यांना हा प्रकार सांगितला. त्यावेळी शाळा सुटण्याची वेळ झालेली असताना दोन्ही विद्यार्थ्यांचे आईवडील मुलांना न्यायला आलेले होते. ही मुले घरी निघून गेली. शिक्षक आणि प्राचार्यांनी याविषयी कारवाई करण्याची आवश्यकता होती. मात्र, त्यांनी याविषयी बोटचेपी भूमिका घेतली.
पीडित मुलगी शाळेतून घरी गेल्यानंतर आईवडिलांना हा घडलेला प्रकार सांगितला. आईवडिलांना मुलीच्या सुरक्षेविषयी काळजी वाटू लागली. त्यांनी शाळेच्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांची शाळेमध्ये जाऊन दुसऱ्या दिवशी भेट घेतली. त्यावेळी शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी तक्रार ऐकून घेण्याऐवजी मुलीविषयीच वेगवेगळे आक्षेप घेऊन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याच फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पीडित मुलीचे आई वडील पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेले. पोलिसांनी घडलेला सर्व प्रकार ऐकून घेत शाळेच्या मुख्याध्यापकासह दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू करण्यात आली आहे. तर, सुपारी देणाऱ्या विद्यार्थ्याला बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाणार आहे.
याविषयी तपास अधिकारी तथा उपनिरीक्षक युवराज घोडके म्हणाले, की दौंडमधील एका इंग्रजी मध्यमाच्या शाळेत हा प्रकार घडला आहे. संबंधित शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमचा तपास सुरू आहे. शाळेमध्ये घडलेला हा प्रकार आहे. विद्यार्थ्यांचे वय लक्षात घेता त्यांच्याशी विश्वासात घेऊन संवाद साधला जात आहे.