
तोतया ‘डिलिव्हरी बॉय’च्या चोरीचा फंडा एखाद्या वेबसिरीजसारखा
चोरीच्या गुन्ह्यांचे अर्धशतक करणाऱ्या सराईताला स्वारगेट पोलिसांकडून बेड्या
पुणे : पुण्यात उंड्री परिसरात पंचतारांकित हॉटेलमधील खोल्यांना लाजवील अशी सदनिका… शेकडो तोळे सोने… आलीशान गाड्या… महागडे हीरे अशी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता… एवढी ‘माया’ जमवणारा कोणी उद्योजक नाही तर भलतेच ‘उद्योग’ करून श्रीमंत बनलेला एक चोर आहे. अंगावर झोमॅटो कंपनीचे ‘डिलीव्हरी बॉय’ला दिले जाणारे कपडे घालून घरफोड्या करणाऱ्या चोरट्याची ही मालमत्ता स्वारगेट पोलिसांनी शोधून काढली आहे. घरफोड्या आणि चोऱ्यांचे अर्धशतक करणाऱ्या या चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यासह साथीदारांकडून तब्बल ८६ तोळे सोने, १५० हिरे, साडेतीन किलो चांदी, १ दुचाकी वाहन, ०२ पिस्तूल, ०५ जिवंत काडतुसे असा ८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गणेश मारुती काठेवाडे (वय , रा. ), सुरेश बाबन पवार (अंबरवेड, गवळीवाडा, ता. मुळशी), रा. संभाजीनगर, बालाजीनगर, भिमसिंग ऊर्फ अजय करणसिंह राजपूत (नथवाला) अशी आरोपींची नावे आहेत. काठेवाडे हा सराईत चोरटा आहे. त्याच्यावर ५५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. तर, सुरेश पवार हा खुनाचा प्रयत्न व खून अशा गुन्ह्यातील आरोपी असून त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. राजपूत हा सराफ असून त्याचे चोरीचे सोने विकत घेतले होते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वारगेट पोलीस ठाण्यात मागील वर्षी घरफोडीचा एक गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्यामधील आरोपीचा शोध घेतला जात होता. पोलिसांनी पुणे शहरातील साधारण ३००० सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. त्यामध्ये संशयीताची अस्पष्ट छबी टिपली गेली होती. दरम्यान, पोलीस अंमलदार शंकर संपते, सागर केकाण, दिनेश उर्फ नाना भांदुर्गे, रफिक नदाफ यांना खबऱ्यामार्फत आरोपीबाबत माहिती मिळाली. आरोपी काठेवाडे यानेच ही घरफोडी केली असून तो ओळख लपवून उंड्री परिसरामध्ये वावरत असल्याचे खबऱ्याने सांगितले होते. पोलिसांनी उंड्री परिसरामध्ये त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला गुन्हा नाकारणाऱ्या आरोपीने पोलिसांचा ‘प्रसाद’ मिळताच गुन्ह्याची कबुली दिली. त्याला अटक करून तपास सुरू करण्यात आला.
आरोपीने चोरी करण्यासाठी झोमॅटो डिलीव्हरी बॉय असल्याचे भासवत शहरातील विविध भागांमध्ये जाऊन सोसायटयांची रेकी केली. पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये १४ घरफोड्या केल्याचे देखील तपासात समोर आले. स्वारगेट एसटी बस स्थानकावर त्याने सात चोऱ्या केल्याचे देखील उघड झाले. त्याने चोरीचे दागिने पवारकडे दिले होते. त्यामुळे पवार याला देखील अटक करण्यात आली. त्याने चोरीचे सोने व चांदी विविध सोनारांकडे विकून पैसे घेतले होते. या व्यवहारामध्ये सोन्याची विक्री करणाऱ्या भिमसिंग ऊर्फ अजयने मध्यस्थी केली होती. त्याला देखील गजाआड करण्यात आले. या वर्षातील पुणे पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनांखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबिकर, पोलीस उप-निरीक्षक रविंद्र कस्पटे, पोलीस अंमलदार संजय भापकर, श्रीधर पाटील, नाना भांदुर्गे, कुंदन शिंदे, सुधीर इंगळे, सचिन तनपुरे, शंकर संपते, सागर केकाण, सतिश कुंभार, रफिक नदाफ, राहुल तांबे, विक्रम सावंत, शरद गोरे, रमेश चव्हाण, उज्वला थोरात, पोर्णिमा गायकवाड, व पोलीस मित्र दिनेश परीहार यांनी केली.
पुणे शहरातील विविध ठिकाणी झालेल्या घरफोडीचा तपास करत असताना आम्हाला माहिती मिळाली होती की काठेवाडे हा यातील मास्टरमाईंड आहे. त्या अनुषंगाने तपास करत असताना तब्बल ३००० सीसीटिव्हीचे फुटेज तपासून आम्ही त्याला अटक केली. काठेवाडे याच्याकडे सखोल तपास करता त्याने झोमॅटो डिलीव्हरी बॉय म्हणून सोसायट्यांमध्ये जावून रेकी करुन विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकूण १४ घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर एकूण ५५ गुन्हे दाखल आहेत. स्वतःची ओळख लपविण्यासाठी काठेवाडे हा उच्चभ्रू सोसायटीमध्ये रहात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोन
काय होती चोरीची पद्धत?
काठेवाडे हा घरफोडी करण्यापूर्वी ‘झोमॅटो डिलीव्हरी बॉय’ म्हणून सोसायट्यांमध्ये जावून रेकी करीत होता. त्यानंतर, घरफोडी करीत होता. पोलीस सीसीटीव्ही तपासून आपला शोध घेतील याची पूर्ण कल्पना असल्याने तो पोलीस आपल्यापर्यंत पोहचू नयेत याकरिता घरफोडी करायला येत असताना शहरातील अंतर्गत रस्त्यांवरून ४० ते ५० किलोमीटरचा प्रवास करायचा. तसेच, घरफोडी करुन परत जाताना देखील पुन्हा ४० ते ५० किलोमीटरचा प्रवास छोट्या-छोट्या गल्लीबोळामधून करायचा.
वेश पालटण्यात वाकबगार
घरफोडी करण्यासाठी येताना व घरफोडी करून परत जाताना स्वतःची ओळख लपविण्यासाठी तो विविध जॅकेट, व टोप्या परिधान करीत होता. तसेच, प्रत्येक वेळी डोक्यावर केसांचा विग बदलून घालत होता. चोऱ्या करण्यासाठी तो सतत वेशभूषा बदलत असे. सीसीटीव्हीमध्ये छबी टिपली जाऊ नये याकरिता मोबाईल फोन कानाला लावून बोलण्याचे नाटक करीत चेहरा लपवित असे.
चोरीच्या पैशांमधून ‘स्मार्ट’ गुंतवणूक
चोरी केलेले सोने व चांदी विकून त्याने लाखों रुपयांची माया गोळा केली. या पैशांमधून तो कर्वेनगरमधील एका उच्चभ्रू भागात सदनिका घेण्याच्या प्रयत्नामध्ये होता. तसेच, त्याने लाखों रुपये गोवा व इतर ठिकाणी मौजमजेसाठी उडवले. तर, काही रक्कम शेअर मार्केटमध्ये (इंट्रा डे ट्रेडिंग) गुंतविल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपींची पार्श्वभूमी
- गणेश काठेवाडे हा सराईत चोरटा आहे. तो मोक्का गुन्ह्यामधून जामिनावर सुटलेला होता. त्याच्यावर पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण हद्दीमध्ये ५५ पेक्षा अधिक घरफोडी, चोरी, वाहन चोरी, दरोडा, एटीएम रॉबरी, जबरी चोरी इत्यादी गुन्हे दाखल आहेत.
- सुरेश पवार अंबरवेड गावचा माजी उपसरपंच आहे. त्याच्यावर आंबेगावमधील बाळू मारणे याच्या खुनाचा आरोप आहे. या गुन्ह्यात त्याला मोक्का लावण्यात आलेला होता. सध्या तो जामिनावर आहे. तसेच, त्याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा देखील दाखल आहे. पवार याने त्याच्या घराच्या टेरेसवर २ पिस्तूल व ०५ जिवंत काडतुसे ठेवलेली आढळून आली. ही शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. त्याच्यावर भारतीय हत्यार कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांची ओळख कारागृहात झाली होती. जामिनावर सुटल्यानंतर पुण्यातील विविध ठिकाणी घरफोडी करण्याचे दोघांनी ठरवले होते.
आरोपी भिमसिंग ऊर्फ अजय हा सोन्याच्या नथ बनविण्याचा व्यवसायीक आहे. पवारने दिलेले सोने घेऊन ते विविध सोनारांकडे गहाण ठेवले. त्यांना वेगवेगळी कारणे सांगून या सोनारांकडून पैसे घेतले. हे पैसे त्याने पवारला दिले. गणेश काठेवाडे याने घरफोडीमधील सोन्याचे दागिने पवार व भिमसिंग ऊर्फ अजय मार्फत ज्या-ज्या सोनारांकडे ठेवले होते; त्या-त्या सोनारांना चौकशीकरिता नोटीस देण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी काय काय जप्त केले?
८६ तोळे सोन्याचे दागिने
साडेतीन किलो चांदी
१५० हिरे
१ दुचाकी वाहन
२ पिस्तूल व ०५ जिवंत काडतुसे
कटावणी, लोखंडी पक्कड, स्कुड्रायव्हर