
कोथरुड गोळीबार प्रकरण भोवले : आंदेकर टोळीनंतर घायवळ टोळीला दणका
पुणे : कुख्यात निलेश घायवळ टोळीच्या गुंडांकडून रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणांनी जायला जागा दिली नसल्याच्या कारणावरून तरुणावर गोळीबार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला होता. तसेच, या गुंडांनी पुढे जाऊन पूर्ववैमनस्यातून आणखी एका तरुणावर कोयत्याने वार केले होते. याप्रकरणी दोन गुन्हे कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात घायवळ टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.
मयूर गुलाब कुंबरे (वय ३०, रा. सागर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड), गणेश सतीश राऊत (वय २६, रा. नवएकता कॉलनी, हमराज मित्र मंडळासमोर,
कोथरुड), मयंक विजय व्यास, दिनेश राम फाटक, दिनेश राम फाटक, आनंद अनिल चांदळेकर (सर्व रा. कोथरुड) अशी आरोपींची नावे आहेत. या गुंडांना निलेश घायवळने पिस्तूल पुरवल्याचे तपासात पुढे आल्याने त्याच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे.
गोळीबारामध्ये प्रकाश धुमाळ (वय ३६, रा. गणेशनगर, थेरगाव) हे जखमी झाले होते. तर, सागर कॉलनीमध्ये वैभव तुकाराम साठे (वय १९, रा. सागर कॉलनी, कोथरुड) याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले होते. ही घटना १७ सप्टेंबर रोजी घडली होती. कोथरुड पोलिसांनी या प्रकरणात खुनाच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे दाखल कारून ६ जणांना बेड्या ठोकल्या होत्या.
पोलिसांनी आरोपींकडे केलेल्या तपासात निलेश घायवळच्या सांगण्यावरून दहशत निर्माण केल्याची कबुली त्यांनी दिली. ‘आपली दहशत कमी होत चालली आहे. आपला धाक निर्माण करा.’ अशी चिथावणी निलेश घायवळने दिल्याचे तपासात समोर आल्याचे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले. कोथरूड पोलिसांनी या टोळीवर मोक्का लावण्याचा प्रस्ताव उपायुक्त संभाजी कदम यांच्यामार्फत अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्याकडे पाठविला होता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या आदेशान्वये टोळी प्रमुख निलेश घायवळसह अक्षय गोगावले, मुसा शेख, जयेश वाघ यांच्यासह १० जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.