
पुणे : विविध कारणांमुळे यापूर्वी तीन वेळा लांबणीवर पडलेली म्हाडाच्या पुणे मंडळाची ४,१८६ घरांची सोडत आता पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. पालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सध्या सोडत काढणे शक्य नसल्याने ही प्रक्रिया अडकली असून, आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतरच सोडत काढली जाण्याची शक्यता आहे.
पुणे मंडळाने २० टक्के सर्वसमावेशक योजना आणि १५ टक्के एकात्मिक योजनेअंतर्गत पुणे पालिका हद्दीतील विविध ठिकाणच्या घरांसाठी सप्टेंबरमध्ये नोंदणी व अर्जविक्री प्रक्रिया सुरू केली होती. मात्र तांत्रिक अडचणींमुळे सोडतीला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे सोडत आधीच तीन वेळा पुढे ढकलण्यात आली होती.
नोंदणी व अर्जस्वीकृती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या सोडतीला मोठा प्रतिसाद मिळाला. ४,१८६ घरांसाठी तब्बल २ लाख १५ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले. मात्र अर्जांची छाननी पूर्ण होण्याआधीच आचारसंहिता लागू झाल्याने सोडत काढता आली नाही.
यामुळे दोन लाखांहून अधिक अर्जदारांची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. सप्टेंबरपासून अर्जदारांनी भरलेली अनामत रक्कम अडकून पडली असून, अनेकांनी कर्ज किंवा क्रेडिट कार्डद्वारे ही रक्कम भरल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. सोडतीच्या तारखेबाबत पुणे मंडळाकडे सातत्याने विचारणा होत आहे.
दरम्यान, आचारसंहितेत सोडत काढण्यास परवानगी मिळू शकते का, याबाबत निवडणूक आयोगाकडे चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र परवानगी मिळण्याची शक्यता कमी असल्याने १६ जानेवारीनंतरच सोडत काढली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.




